आंबेठाण, ता. ३ ः वासुली फाटा (ता. खेड) येथे पादचारी महिलांच्या गळ्यातील दागिने व मोबाइल हिसकावणे, कामगारांना रस्त्यात अडविणे, कंपन्यांमध्ये चोरी आदी घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सायंकाळनंतर रस्त्याने चालायचे की नाही? असा प्रश्न स्थानिकांसह कामगारांना पडला आहे. एकंदरीत या भागात मोकळेपणाने फिरणेच अवघड बनले असून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर या भागात पोलिसांचा वचक राहिला नसून केवळ वाहनचालकांवर कारवाई करण्यावर पोलिसांचा भर असल्याचे आरोप स्थानिकांकडून होत आहेत.
वासुली फाटा हा भाग चाकण एमआयडीसीमधील टप्पा क्रमांक दोनमध्ये येतो. या भागात अनेक स्थानिक उद्योजकांसह परराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून या भागात लोक उदरनिर्वाह करण्यासाठी आलेले आहेत. परंतु या भागात सध्या वाढत असलेले अवैध व्यवसाय, चोरीच्या घटना, कामगारांना लुटणे, अवैध वेश्या व्यवसाय, अपघात यामुळे या भागाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. नुकतेच वासुली येथे शतपावली करणाऱ्या एका महिलेचे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दागिने हिसकावून नेले. यापूर्वी देखील अनेकांचे मोबाइल हिसकावून नेण्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत.
---
बुलेट राजांवर वचक कोण ठेवणार ः
या भागात एमआयडीसीचा पैसा खुळखुळत असल्याने अनेकांनी बुलेट दुचाकी घेतल्या आहेत. परंतु त्यांचे सायलेन्सर बदलून मोठमोठे आवाज काढण्याची जणू स्पर्धा रंगली आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. केवळ चौकात उभे राहून वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यापुरते वाहतूक पोलीस आहेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
---
अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष ः
वासुली फाटा येथे नागरिकांना तत्काळ सेवा मिळावी यासाठी लोकसहभातून पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. तेथे कधीतरी पोलिस असतात. अवैध वाहतूक आणि रिक्षावाले भररस्त्यात मध्येच वाहने आडवीतिडवी उभी करतात. त्यामुळे मोठ्या वाहनांची अडचण होते आणि मग वाहतूककोंडी होते. या अवैध वाहतूक करणाऱ्यांकडे देखील पोलिसांचे लक्ष नसल्याचे दिसून येते.
---
कोट ः
आमचे घर भर वर्दळीच्या रस्त्यावर आहे. तरीही चालताना महिलांचे दागिने हिसकावणे ही गंभीर बाब आहे. यात एखाद्याचा जीव सुद्धा जावू शकतो. आता तर महिलांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. पोलिसांनी यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
- दीपक लिंभोरे, उपसरपंच, वासुली
---- ---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.