matheran matheran
टूरिझम

रिमझिम पावसात अनुभवावे 'माथेरान'

संपूर्ण आशिया खंडातील एकमेव गिरिस्थान जिथे खाजगी वाहनांना प्रवेश नाही, ही माथेरानची खरी ओळख

प्रशांत ननावरे

मित्र-मैत्रिणींसोबतची पिकनिक, धुक्यातली चाल, रिमझिम पावसाचा आनंद, घनदाट वृक्षराजी, पक्ष्यांचा किलबिलाट अशा सर्व गोष्टी जर एकाच ठिकाणी अनुभवायच्या असतील तर मुंबईपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान या गिरिस्थानाशिवाय दुसरा कोणताही पर्याय शोधूनही सापडणार नाही. धुक्यातून वाट काढत वळणं घेत वर जाणारा रस्ता. दुतर्फा पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. प्रवेशद्वारामधून आत शिरल्यावर जणू स्वागतासाठी उभे असलेले रुबाबदार घोडे. पायाखाली लाल माती अन्‌ नजर जाईल तिथवर पसरलेली हिरवीकंच घनदाट वृक्षराजी. वातावरणातील गारवा आणि माती, फुलं, पानांच्या सुगंधांनी दरवळणारी शुद्ध हवा... एका दिवसाची धावती भेट असो वा आठवडाभराचा मुक्काम, एकट्याने जायचे असो वा कौटुंबिक सहल किंवा मित्र-मैत्रिणींसोबत धमालमस्ती, माथ्यावर पोहोचण्यासाठी वाहन आणि ट्रेकिंग असे दोन्ही पर्याय उपलब्ध असलेले मुंबईपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावरील गिरिस्थान म्हणजे माथेरान!

संपूर्ण आशिया खंडातील एकमेव गिरिस्थान जिथे खाजगी वाहनांना प्रवेश नाही, ही माथेरानची खरी ओळख. खरंतर ‘वाहनांना प्रवेश नाही’ हे इथे जास्त अधोरेखित करावसं वाटतं, कारण त्यामुळेच माथेरान आजतागायत प्रदूषणमुक्त आहे. अन्यथा समुद्रसपाटीपासून ७५० मीटर उंचीवरील या पठारावर ब्रिटिशकालीन रेल्वेने जाण्याचा आनंद लुटता आला नसता, लाल माती, धुक्यातून चालण्याची मजा अनुभवता आली नसती, मातीच्या पाऊलवाटांवरून चालताना पाऊस सुरू झाल्यावर आडोशाला लपण्याऐवजी रिमझिम बरसणाऱ्या पावसातून चालण्याचे स्वर्गसुख अनुभवता आले नसते.

माथेरानमध्ये दिवसा पडलेले सुंदर धुके

‘मातेचे रान’ म्हणजेच ‘माथेरान’वर आधीपासून लोकवस्ती होती. १८५० मध्ये मुंबई नागरी सेवेतील ह्यू मॅलेट या ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रथम भेट दिल्यानंतर भौगोलिक महत्त्व ओळखून ब्रिटिशांनी थंड हवेचे ठिकाण म्हणून ते विकसित केले. माथेरानचे निसर्गसौंदर्य लक्षात घेऊन सर आदमजी पीरमॉय यांनी सर्वात प्रथम ‘नेरळ ते माथेरान’ अशी पाऊलवाट तयार केली. पुढे त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधून रेल्वेसेवा सुरू केली. २००७ साली या रेल्वेला शंभर वर्षे पूर्ण झाली. रेल्वेमार्गावरील जुम्मापट्टी या स्थानकानंतर गिरीराणी सतत दरीला खेटून जात असते, त्यामुळे हा प्रवास डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.

सह्याद्रीच्या मुख्य डोंगरारांगेपासून थोड्या वेगळ्या झालेल्या डोंगररांगेवर माथेरान आहे. माथेरानचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या माथ्यावरून अनेक गडांचे दर्शन होते. पनवेलच्या बाजूने प्रबळगड, इरशाळगड दिसतो, वन ट्री हिलच्या बाजूने माणिकगड आणि कर्नाळा, पॅनोरमा पॉईंटवरून कोथळीगड आणि निरभ्र आकाश असल्यास सिद्धगडही दिसू शकतो. त्याशिवाय डोंगररांगांमध्ये लपलेल्या राजमाचीचेही दर्शन होते. माथेरान म्हणजे केवळ बाजारपेठ नाही. बाजारपेठेच्या बाहेर पडल्यावर खऱ्या माथेरानचे दर्शन व्हायला सुरुवात होते. चौकाचौकात दिशादर्शक म्हणून लावलेले फलक, घोड्यांवर चढण्या-उतरण्यासाठीचे चौथरे, कधीकाळी धनिकांनी बांधलेले वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली निवासस्थाने तुमचे लक्ष वेधून घेतात.

माथेरानमधील पर्यटन आकर्षणे

मुख्य वाटेवरून आत चालत गेल्यावर जंगलात पानांचा सडा पडलेला दिसतो. घनदाट वृक्षराजी आणि त्यामधून मातीच्या पाऊलवाटांवर चालण्याचा अनुभव येथे घेता येतो. संपूर्ण माथेरानच्या बाजूने या पाऊलवाटा आहेत. प्रत्येक पॉईंटकडे जाणारे रस्ते वेगळे असले तरी कुठे ना कुठेतरी या पाऊलवाटा एकमेकींना येऊन भेटतात. थंडीच्या दिवसांत धुक्यात हरवलेल्या, पावसाळ्यात रिमझिम पावसात न्हाऊन निघालेल्या आणि उन्हाळ्यात ऊन-सावलीचा खेळ सुरू असताना आसपासची निरव शांतता अनुभवत या पाऊलवाटांवरून चालत राहण्याची मजा काही औरच असते. गिरिस्थानाच्या चहुबाजूला अनेक सौंदर्यस्थळे आहेत. हार्ट, पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉर्क्युपाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल या नावांनी पॉईंट प्रसिद्ध आहेत. आवर्जून भेट द्यावी असा शार्लट सरोवर आणि इतर अकरा झरे आहेत. डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचे उगमस्थान असलेल्या या सरोवराच्या बाजूला बसून तासनतास गप्पा मारणे याला सुट्टीचे खरे चीज होणे म्हणता येईल.

माथेरानच्या जंगलात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. पक्षी, किटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे ते वसतिस्थान आहे. म्हणूनच इथे भटकंती करताना भरपूर चालायची आणि शांतपणे प्रत्येक गोष्ट न्याहाळण्याच्या तयारीनिशी जायला हवे. मुंग्यांची वारूळं, पन्नास-साठ फुटांवरून झाडांच्या फांद्यांवरून खाली लटकणारे कोळी-किटक, जुन्या उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या खोडावर उगवलेले मशरूम, अचानक लाल मातीवरून सरपटत जाणारा साप आणि कधीही न पाहिलेले असंख्य जीव या जंगलात वस्तीला असल्याची अनुभूती इथे फिरताना येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT