Mumbai CSMT
Mumbai CSMT Sakal
टूरिझम

अनोखा कलाविष्कार!

प्रशांत ननावरे

ब्रिटिशांनी भलेही भारतावर राज्य करून वस्तू लुटून नेल्या असतील; पण पुढील अनेक वर्षे भारतीयांना उपयोगात येतील अशा गोष्टीही ते मागे सोडून गेले आहेत.

लाखो मुंबईकर दररोज रेल्वेने प्रवास करतात. अनेकदा ‘सीएसएमटी’वरून ये-जा करतात, परंतु किती लोकांनी आजवर वेळ काढून ‘सीएसएमटी’ची सुंदर वास्तू पाहिली आहे? फोटो किंवा चित्रपटांमध्ये प्रामुख्याने दाखवल्या जाणाऱ्या या भव्य वास्तूच्या समोर उभे राहून लांबूनच छायाचित्रे काढू नका. या वास्तूचा प्रत्येक कोपरा आणि सर्व बाजूंचे निरीक्षण केले तर दिसेल अनोखा कलाविष्कार!

ब्रिटिशांनी भलेही भारतावर राज्य करून वस्तू लुटून नेल्या असतील; पण पुढील अनेक वर्षे भारतीयांना उपयोगात येतील अशा गोष्टीही ते मागे सोडून गेले आहेत. भारतातील अनेक शहरांमध्ये उभारलेल्या पायाभूत सुविधांची सर गेल्या सत्तर वर्षांत केलेल्या कामांना नाही हे नाकारता येत नाही. त्यांनी उभारलेली भव्य आणि कलात्मक रेल्वे स्थानके आज भारतीय जागतिक वारसा म्हणून जगभर डोक्यावर घेऊन मिरवत आहेत. व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने बांधण्यात आलेले आणि आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून सर्वपरिचित असलेली वास्तू त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

‘सीएसएमटी’ला कसं पोहचायचं याचा मार्ग दाखवण्याची गरज नाही. कारण ‘सर्व रस्ते स्वर्गात जातात’ या वाक्याप्रमाणे मुंबईची सुरुवात आणि म्हणाल तर शेवटही याच स्थानकापासून होतो. त्यामुळे मुंबईत कुठेही असाल तरी ‘सीएसएमटी’ला पोहोचण्याचा मार्ग सहज सापडेल किंवा कुणीही नेऊन सोडेल. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावरील सर्वांत मोठे रेल्वे स्थानक असलेल्या ‘सीएसएमटी’ला इतर मार्गांवरून पोहोचायचे असल्यास दादर अथवा कुर्ला या स्थानकांवरून थेट लोकल मिळते. मुंबईत बाहेरून येणाऱ्या दक्षिण मार्गावरील गाड्या वगळता इतर दिशांकडून येणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या ‘सीएसएमटी’लाच येतात किंवा तिथूनच सुटतात. रेल्वेच्या डब्यातून फलाटावर पाय ठेवताच ‘सीएसएमटी’च्या भव्यतेची प्रचीती येते. एकाला एक लागून असलेले तब्बल अठरा फलाट आणि त्यावर शहरांतर्गत आणि शहराबाहेर जाणाऱ्या रेल्वेगाड्या नवख्या माणसाला पेचात पाडतात.

जागतिक नकाशावर मुंबईची ओळख दर्शवण्यासाठी ‘सीएसएमटी’च्या वास्तूचाच उपयोग केला जातो. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त १८७८ ते १८८८ या दहा वर्षांच्या कालावधीत उभारण्यात आलेली ही वास्तू वास्तूकलेचा अनोखा आविष्कार आहे. फेडरिक विल्यम्स स्टीव्हन्स हा ब्रिटिश वास्तुविशारद याचा निर्माता. व्हिक्टोरियन गॉथिक आर्किटेक्चर, भारतीय आणि मुघलकालीन पारंपरिक कलेचा अनोखा संगम या वास्तूमध्ये आढळून येतो. उपनगरीय रेल्वेच्या फलाट क्रमांक १ आणि ७ च्या बाजूला असलेल्या दगडी भिंतींमध्ये असलेल्या काचेच्या तावदानांवर केलेले रंगीत नक्षीकाम, त्याखाली असलेले मोठे दरवाजे नैसर्गिक प्रकाश आत येण्यासाठी निर्मिलेले आहेत. फलाट क्रमांक दोनवरून बाहेर पडताना समोरच दिसणारे मोठे घड्याळ आणि त्याबाजूला असणारी काचेची रंगीत तावदाने पाहून आपण एका वेगळ्या काळात प्रवेश करत असल्याचा भास होतो. रेल्वे फलाट आणि तिकीटघराच्या मधील मोकळ्या जागेत असलेले खाली करड्या आणि वर सोनेरी रंगाचे नक्षीकाम असलेले खांब लक्ष वेधून घेतात. स्थानकाच्या तिकीटघरात प्रवेश करताना असणारे भव्य दगडी दरवाजे आणि त्यावरील तावदानांवरील रंगीत काचांचे नक्षीकाम आता कुठे शोधूनही सापडणार नाही.

जमिनीपासून छतापर्यंत गेलेले एकसंध, मजबूत असे दगडी खांब हे या वास्तूचे आकर्षण. छताच्या एका खिडकीवरील मोराचे चित्र लक्ष वेधून घेते. संपूर्ण कलाकुसर बारकाईने पाहिल्यास एका खिडकीच्या खाली सुंदर शिल्प दिसते, ज्यात भारतीय संस्कृतीची विविधता दर्शवणाऱ्या १४ वेगवेगळ्या पगड्या घातलेल्या व्यक्ती दिसतात. इटालियन मार्बलचा वापर करून पृष्ठभागावरही सुंदर नक्षीकाम केले आहे. तिकीटघराच्या चारही बाजूंनी असलेल्या बाल्कनींची त्रिमितीय रचना आणि ठिकठिकाणी केलेले दगडी नक्षीकाम, खांबांच्या शिरोभागी लावण्यात आलेले दिवे पाहून आपण एखाद्या राजमहालात उभे असल्याचा भास होतो.

‘सीएसएमटी’च्या आतील रूपापेक्षा बाह्यरूप हे अधिक विलोभनीय आहे. सँडस्टोन आणि लाईमस्टोनचा वापर करून इंग्रजीमधील सी अक्षराच्या आकारात बांधण्यात आलेली ही वास्तू कितीही वेळा पाहिली तरी मन भरत नाही आणि वेळोवेळी कलाकुसरीचे नवनवीन बारकावे अचंबित करून सोडतात. इमारतीच्या मध्यभागी असलेल्या गोल घुमटावरील दगडी नक्षीकाम, सर्व बाजूंनी असलेले अर्धगोलाकार दरवाजे आणि तावदानांची कलात्मक संरचना दुरूनही ठसठशीतपणे दिसते. गोलघुमटाच्या शिरोभागी एका महिलेची दगडी मूर्ती आहे, जिला ‘दि लेडी ऑफ प्रोग्रेस’ असे संबोधले जाते. मूर्तीच्या डाव्या हातात चक्र आणि उजव्या हातात मशाल आहे. ही मूर्ती अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ची आठवण करून देते. इमारतीच्या मुख्य दरवाजाच्या एका स्तंभावर सिंहाचे; तर दुसऱ्या स्तंभावर वाघाचे बैठे शिल्प आहे.

ही संपूर्ण वास्तू इतकी भव्य आणि कलात्मक आहे, की दुरून त्याचे बारकावे कळणं केवळ अशक्यच. म्हणूनच याच वास्तूमध्ये असलेले संग्रहालय पाहणे अत्यावश्यक ठरते. वास्तूवर विविध ठिकाणी केलेले नक्षीकाम आणि संबंधित जुनी नवीन छायाचित्रे येथे पाहायला मिळतात. भारतीय रेल्वेच्या इतिहासासंबंधित विविध छायाचित्रे आणि भारतातील ऐतिहासिक वास्तूंचेही चित्रमय दर्शन येथे घडते.

लाखो मुंबईकर दररोज रेल्वेने प्रवास करतात. अनेकदा ‘सीएसएमटी’वरून ये-जा करतात, परंतु किती लोकांनी आजवर वेळ काढून ही सुंदर वास्तू पाहिली आहे? फोटो किंवा चित्रपटांमध्ये प्रामुख्याने दाखवली जाणारी ही वास्तू प्रत्येक मुंबईकराने प्रत्यक्ष अनुभवायला हवी. या भव्य वास्तूच्या समोर उभे राहून लांबूनच तिची छायाचित्रे न काढता तिचा प्रत्येक कोपरा आणि सर्व बाजूंचे निरीक्षण करायला हवे. दररोजच्या रेल्वे प्रवाशाच्या भूमिकेतून बाहेर येत सुट्टीचा एक दिवस या नेहमीच्याच तरीही अनोख्या वास्तूसफरीसाठी आवर्जून काढायला हवा.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT