udwada village sakal media
टूरिझम

नजरेत भरणारं उदवाडा

प्रशांत ननावरे

नजरेत भरणारं उदवाडा

सकाळी उन्हं पडायच्या आधी उदवाडामध्ये पोहोचलात, तर काही स्थानिक महिला ताटात ‘दूध ना पफ’ घेऊन दारोदारी फिरताना दिसतात. लंबगोलाकार पत्र्याच्या डब्यातून आंबा आइस्क्रीम विकणाराही भेटतो. ताजं दूध आणि आंब्याचा गर हाताने घोटवून तयार केलेलं हे आइस्क्रीम फिरताना आलेला सर्व थकवा एका क्षणात नाहीसा करून टाकतं.

राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून मुंबईपासून गुजरातच्या दिशेनं १८३ किलोमीटर गेल्यास तुम्ही समुद्रकिनारी वसलेल्या एका शांत, ऐतिहासिक वारसा, आगळावेगळा इतिहास लाभलेल्या आणि गोड स्वभाव असलेल्या माणसांच्या गावात पोहोचता. समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या या गावात गेल्यावर कौलारू, लाकडी बांधकाम आणि कलाकुसर असलेली जुन्या पद्धतीची घरं पाहायला मिळतात आणि यात काय आहे, बघण्यासारखं असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो; पण आजूबाजूला दाटीवाटी, अस्वच्छता, गर्दीची सवय झालेल्या मुंबईकरांनी असंही निवांत गाव असू शकतं, याचा अनुभव घेण्यासाठी वलसाड जिल्ह्यातील ‘उदवाडा’ला नक्की भेट द्या.

‘उदवाडा’ हे पारशी लोकांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. इराणशहा हा पवित्र अग्नी येथील इराणशहा अग्यारीत ठेवलेला आहे. गेली चार शतकं इराणमधून आलेल्या झोराष्ट्रीयन लोकांचं येथे वास्तव्य आहे. उदवाडा येथे पश्चिम रेल्वे मार्गावरून रेल्वे आणि पुढे टॅक्सीनेदेखील पोहोचता येते. गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला लागल्यावर रस्त्याच्या दुतर्फा आमराई, नारळी-पोफळीच्या बागा आणि झाडांची दाटी दिसते. गावात प्रवेश केल्यावर लगेचच जुनी घरं नजरेस पडायला सुरुवात होते. कोणत्याही गावच्या रस्त्यांवर लोकांची गर्दी कमीच असते, पण इथे माणसं इतकी कमी दिसतात की गावात संचारबंदी लागू आहे की काय, अशी शंका येते. काही अपवाद वगळता गावातील जुनी घरं आजही अतिशय चांगल्या अवस्थेत आहेत. पारशी समुदायामध्ये आर्थिक सुबत्ता चांगली असल्यामुळे ज्यांची इथे घरं आहेत, ती मंडळी मोठ्या शहरांमध्ये किंवा परदेशात स्थायिक असून, बहुतांश लोक येथे सुट्यांमध्ये किंवा कामाच्या निमित्ताने येतात.

उदवाडाला स्लिपी टाऊन म्हणजेच झोपलेलं गाव म्हटलं जातं. कारण या गावात कधीच कुठेच गर्दी, गोंधळ किंवा माणसांची लगबग पाहायला मिळणार नाही. आतश बेरहाम हे पारशी लोकांचे प्रार्थनास्थळ हे या गावातील खास आकर्षण. या प्रार्थनास्थळामध्ये शेकडो वर्षे तेवत असेलली ज्योत पाहणे खरंतर अद्भूत अनुभव असू शकतो; परंतु नियमाप्रमाणे केवळ झोराष्ट्रीयन लोकांनाच या प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश करता येतो; तरीही प्रार्थनास्थळाची वास्तू, त्यावरील मूर्ती न्याहाळ्यात वेळ दवडू शकता, इतकी त्यांची भव्यता आणि कलाकुसर नजरेत भरणारी आहे. गावातील गल्ल्यांमधून फिरणे हा एक वेगळा अनुभव असतो. बैठ्या, एकमजली, दुमजली घरांची बांधणी लक्ष वेधून घेणारी आहे. लाकडी बांधकाम असलेल्या घरांना बाहेर सुंदर पडव्या आहेत. या पडव्यांमध्ये पारशी वेशात एखादा बावा आरामखुर्चीवर पेपर, पुस्तक वाचताना किंवा निवांतपणे पहुडलेला दिसू शकतो. लाकडी चौकटी असलेल्या खिडक्या, दरवाजे, त्यासमोर ऐसपैस लाकडी झोपाळा, आरामखुर्ची आणि पायऱ्या असलेल्या घरांचे फोटो काढल्याशिवाय आपले मन स्वस्थ बसत नाही.

गावाची माहिती देणारे माहिती केंद्र आणि वस्तुसंग्रहालयदेखील पाहण्यासारखे आहे. गावात निवांत भटकंती झाल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्त पाहूनच तिथून निघा. उदवाडाचा समुद्रकिनारा फारसा प्रेक्षणीय नाही; पण समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्यासाठीचा रस्ता कोळी बांधवांच्या वस्त्यांमधील छोट्या गल्ल्यांमधून जातो. पारशी लोक खाण्याचे शौकीन असतात. या छोट्याशा गावात खाण्याची काही मोजकीच ठिकाणं आहेत; पण त्याची भेट आणि काही खाद्यपदार्थ चाखणं अनिवार्य आहे. मुंबईतून पहाटे निघून सकाळी उन्ह पडायच्या आधी उदवाडामध्ये पोहोचलात, तर काही स्थानिक महिला ताटात ‘दूध ना पफ’ म्हणजेच फेसाळ दुधाचे ग्लास घेऊन दारोदारी फिरताना दिसतात. साखर टाकून फेटलेले अर्धा ग्लास दूध आणि अर्धा ग्लास दुधाचा फेस असे हे गोड पेय फक्त इथेच प्यायला मिळते. गावात फिरत असताना लंबगोलाकार पत्र्याच्या डब्यातून आंबा आइस्क्रीम विकणाराही भेटतो. ताजं दूध आणि आंब्याचा गर हाताने घोटवून तयार केलेलं हे आइस्क्रीम गावात फिरताना आलेला सर्व थकवा एका क्षणात नाहीसा करून टाकतं. याशिवाय गावातील इराणी बेकरी आणि पारंपरिक पदार्थ घेतल्याशिवाय उदवाडाची भेट पूर्ण होऊच शकत नाही.

दर वर्षी डिसेंबर महिन्यात या गावात इराणशाह उदवाडा उत्सव भरतो. या उत्सवासाठीदेखील मुख्यत: पारशी लोकांनाच प्रवेश असला, तरी या काळात हे गाव अधिक बोलके असते. घरं सजवली जातात, गावातील रस्त्यांवर चित्र, फोटोंची प्रदर्शने भरवली जातात, भिंती रंगवल्या जातात. हॉटेल्समध्ये खास पारंपरिक पारशी पाककृती बनवल्या जातात. त्यामुळे स्लिपी टाऊन पाहण्यात विशेष रस नसेल, तर उत्सवाच्या निमित्तानेही गावाला भेट देता येऊ शकते.

- प्रशांत ननावरे

nanawareprashant@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

SCROLL FOR NEXT