remdesivir
remdesivir 
उत्तर महाराष्ट्र

धुळे ‘सिव्हिल’चा संतापजनक कारभार; दोंडाईचातील ८१५ रेमडेसिव्हिरची चौकशी करा 

सकाळवृत्तसेवा

धुळे : येथील साक्री रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलने दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील उपजिल्हा रुग्णालयास पाच दिवसांत ७००, तर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीने कोविड केअरशी संलग्न मेडिकल दुकानाला सरासरी ११५ रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा केला. सिव्हिल हॉस्पिटल दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयावर मेहेरबान का झाले, संबंधित ७०० इंजेक्शन खरोखर गरजू रुग्णांना दिले गेले किंवा नाही, यांसह पुरवठा करण्यामागच्या मौलिक कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी संतप्त पीडित नातेवाइकांकडून होत आहे. 
जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. वैद्यकीय सल्ल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन मिळविण्यासाठी तहान-भूक विसरून अहोरात्र वणवण करत आहेत. जिल्ह्याला इंजेक्शनचा जो काही साठा दिवसाला प्राप्त होतो, त्यात प्रथम शासकीय रुग्णालये आणि घोषित कोविड केअर सेंटरचा समावेश असतो. कोविड केअर सेंटरशी संलग्न मेडिकल दुकानाला रेमडेसिव्हिरचा साठा दिला जातो. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने इंजेक्शन वाटप नियोजनासाठी विशेष समितीची स्थापना केली आहे. 
 
सिव्हिल दोंडाईचावर मेहेरबान 
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांनी सोमवारी (ता. १२) पाहणी केल्यानंतर मेडिकल स्टोअरच्या कर्मचाऱ्याने घाईघाईने ताब्यातील २०० इंजेक्शनच्या साठा रजिस्टरला नोंद करत लागलीच कोरोना वॉर्डला पाठविला. त्या वेळी रजिस्टर तपासले असता, सिव्हिल हॉस्पिटलच्या कार्यक्षेत्रातील दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयास ५ ते १० एप्रिलपर्यंत ७०० रेमडेसिव्हिरचा साठा पाठविल्याची धक्कादायक नोंद आढळली. गरजू रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यास कुणाचाही विरोध नाही, ते दिलेच गेले पाहिजे. मात्र एकट्या दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील रेमडेसिव्हिरची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असू शकते का? हा चौकशीचा मुद्दा असल्याचे पीडित नातेवाइकांनी सांगितले. 
 
शिंदखेड्याला लाभ का? 
शिंदखेडा येथे कोविड केअर सेंटर दर्शविले आहे. तेथील ऑक्सिजन सिलिंडर दोंडाईचात दिले गेले आहेत. या सेंटरमध्ये फिजिशियन डॉक्टर किंवा एमडी, एमबीबीएस डॉक्टर नाही. कोविडची प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांना योग्य ते उपचार दिले जातात. त्या मुळे तेथे रुग्णाला रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. असे असतानाही कागदोपत्री कोविड केअर सेंटर असल्याने जिल्हा इंजेक्शन वाटप समितीने शिंदखेडा येथील समर्थ मेडिकलला गेल्या तीन दिवसांपूर्वी ४८, नंतर ४८ आणि १९ इंजेक्शनचा साठा दिल्याचे आढळले आहे. दोंडाईचा व शिंदखेडा येथील स्थितीचे अवलोकन केले असता अनुक्रमे पाच दिवसांतच ७०० आणि ११५, असे तब्बल ८१५ इंजेक्शनचे वाटप झाल्याचे समोर आले. त्या मुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी वस्तुस्थिती समोर येण्यासाठी चौकशी करावी, अशी मागणी पीडित नातेवाईक करत आहेत. त्यात ८१५ इंजेक्शन दिलेल्या रुग्णांची पारदर्शकतेने हिस्ट्री तपासली जावी, अशीही मागणी आहे. 
 
जिल्हा वाटप समिती अशी 
जिल्हा रेमडेसिव्हिर इंजेक्शन वाटप समितीचे जिल्हा शल्यचिकित्स डॉ. माणिकराव सांगळे अध्यक्ष आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त महेश देशपांडे सचिव असून, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, आयएमए तसेच निमा या वैद्यकीय संघटनेसह केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सदस्य आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT