शनिमांडळ (नंदुरबार) : नंदुरबार नगर परिषदेतील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पाची संकल्पना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी मांडली आणि हा प्रकल्प मागील तीन महिन्यांपासून कार्यान्वित झाला आहे. सध्या प्रकल्पामधून तयार होणाऱ्या विजेतून महिन्याला सहा ते सात लाख रुपयांची बचत होत आहे. उर्वरित ठिकाणी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर परवानगी दिल्यास बचतीमुळे येणाऱ्या पाच ते सहा वर्षांत प्रकल्प किंमत संपूर्णपणे वसूल होणार आहे.
सौरऊर्जा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणावर राबविणारी नंदुरबार नगर परिषद महाराष्ट्रातील पहिली पालिका ठरली आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत निधी मिळालेला असून, ९३९ किलो वॅटचा हा प्रकल्प सुरू झाल्यापासून नंदुरबार नगर परिषदेची ऊर्जाबचतीसह आर्थिक बचत मागील तीन महिन्यांपासून होत आहे. हा प्रकल्प एकूण दहा साइटवर लावला असून, झराळी वॉटर पंपिंग स्टेशन, झराळी वॉटर फिल्टर प्लांट, एस.टी.पी. प्लांट नळवा आणि इतर ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारलेले आहेत.
मोनो क्रिस्टलाईन पॅनलचा वापर
प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मोनो क्रिस्टलाइन सौरऊर्जा पॅनल लावलेले आहेत. मोनो क्रिस्टलाइन सौरऊर्जा पॅनल देशात पहिल्यांदाच सरकारी प्रकल्पामध्ये वापरले आहेत. त्याचप्रमाणे एबीबी आणि फ्रॉनीयस या युरोपियन कंपन्यांचे इन्व्हर्टर वापरलेले आहेत. तसेच डीसी केबलिंग करताना फ्रॉगलिप आणि ऑपटीमाईस्ड स्ट्रिंगिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या प्रकल्पात वापरलेल्या स्ट्रक्चरचे स्टॅड विश्लेषण केलेले आहे. अशा प्रकारे सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट डिझाइन यांची सांगड या प्रकल्पाच्या माध्यमातून नंदुरबार नगर परिषदेने घातली आहे. त्याचा परिणाम आतापर्यंत झालेल्या चांगल्या वीज उत्पादनातून दिसून येत आहे.
२५ वर्ष वीजबचत
या प्रकल्पातून नियमित वीज उत्पादन व्हावे, यासाठी देखभाल दुरुस्तीसुद्धा नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहे. हा प्रकल्प अभूतपूर्व डिझाइनमुळे तंत्रशिक्षणातील तरुण विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, नागरिक यांना मार्गदर्शक ठरणार आहे. लॉकडाउनमध्येही अत्यावश्यक सेवांमध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण केले. नंदुरबार पालिकेची पुढील २५ वर्षे वीजबचत तर होणार आहे. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सर्व नंदुरबारवासीयांना अभिमानास्पद वाटावा, अशा प्रकल्पामुळे शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नंदुरबार पालिका एकूण दहा ठिकाणी असे सोलर प्लांट कार्यान्वित करीत आहे. त्यापैकी पाच सोलर प्लांट हे पूर्ण ताकदीनिशी तयार होऊन कार्यरत झाले आहेत. उरलेले पाच सोलर प्लांट पूर्ण आहेत. परंतु महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे हे पाच प्लांट तयार असून, सध्यातरी बंद आहेत. त्यांनी सहकार्य केल्यास हे प्लांटही चालू होतील. परिणामी, नंदुरबार पालिकेला लाखो रुपयांचा फायदा होणार आहे.
-चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार
संपादन- राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.