residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

बालजगत-पाच रुपयांत पुस्तक 

विद्या सुर्वे-बोरसे

सदर : बालजगत 
---- 
विद्या सुर्वे-बोरसे 
 
     बालक हा दुय्यम ग्राहक आहे. स्वतः कमावता नसल्यामुळे बालकाला आर्थिकबाबतीत दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे बालकाच्या निर्णयापेक्षा किंवा मतापेक्षा जो पैसे देणार आहे, त्याचे मत महत्त्वाचे ठरते. पैसेवाल्या व्यक्तीने घेतलेला निर्णय बालकाच्या जीवनात सतत हस्तक्षेप करत असतो. बालकावर कोणत्या कारणासाठी किती पैसे खर्च केले जावेत, याचा निर्णय वडीलधारे लोक घेत असतात. 
     पुस्तक आणि बालक यांच्यात खूप वेळा ही निर्णयप्रक्रिया अडथळा निर्माण करते. बालकाला आवडणारे पुस्तक त्याच्या हाती येईलच याची शाश्‍वती नसते. पुस्तक जर अभ्यासक्रमाचा भाग नसेल तर बालकाचे म्हणणे गांभीर्याने घेतले जातेच असे नाही. "मुलं वाचत नाहीत', अशी तक्रार करणारे पालकदेखील मुलाच्या हाती मुलाने मागितलेले पुस्तक विकत घेऊन देत नाहीत. पुस्तकाबद्दल पालकांचा जो अल्प समज असेल त्याचा वापर करून ते मुलाच्या हातावर कुठले तरी पुस्तक टेकवत असतात. बहुसंख्य पालकदेखील वाचनापासून शेकडो मैल दूर आहेत. "आमची मुले पुस्तक वाचत नाहीत' अशी ओरड करणारे पालक स्वतःच्या हातात एखादे पुस्तक घेऊन वाचन करत आहेत, असे दृश्‍य दिसणार नाही.

   मूल अनुकरणातून शिकत असते, या साध्या सत्याचा पालकांना विसर पडलेला असतो. त्यामुळे मग अशा पालकांकडून गुळगुळीत पानांची, सुबक रंगीत चित्रांची, मोठ्या टाइपातली पुस्तके मुलांची पुस्तके म्हणून बालकांच्या हातात ठेवली जातात. पुष्कळ वेळा ही पुस्तके आशयाच्या पातळीवर सुमार असतात. जरादेखील नावीन्य, कल्पकता त्यात नसते. मुलांना अशी पुस्तके कुठल्याही अंगाने त्यांची वाटत नाहीत. पालकांनी थोपवलेली अशी पुस्तके मुले वाचतील कशी? 

   मुलांसाठीची मराठी पुस्तके कशी असावीत?, हे सांगण्यासाठी विपुल दाखले देता येतील. ज्योत्स्ना, राजहंस, गमभन, मौज, पॉप्युलर, माउस, ऊर्जा, साकेत, स्पर्श या प्रकाशनांचा उल्लेख आवर्जून करता येईल. या प्रकाशनांनी प्रकाशित केलेली बहुसंख्य पुस्तके त्यांच्या मांडणीपासून लक्षात राहण्यासारखी आहेत. त्यांच्या जोडीला प्रथम, बीजेव्हीएस, साने गुरुजी कथामाला यांच्या प्रकाशनांचा समावेश करता येऊ शकेल. 
आजरा (जि. कोल्हापूर) या गावातून ऋग्वेद नावाचे प्रयोगशील मासिक प्रकाशित होत असते. मुलांसाठी काम कसे करावे? याचा आदर्श वस्तुपाठ म्हणून या मासिकाच्या कार्याकडे पाहता येते. या मासिकाच्या वतीने चिल्ड्रन रिलीफ फंड या अल्प मूल्य योजनेंतर्गत पुस्तके प्रकाशित केली जातात. वाडीतांड्यावरच्या मुलांना अत्यल्प किंमतीत पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या ध्यासातून सोफिया (सुभाष विभुते), प्रिय अब्बू (फारुक काझी), झुलू (चंद्रकांत निफाडे), गरगर घागर (माया धुप्पड), आज्जोपिझ्झा (सावित्री जगदाळे), गिजूभाईंच्या आठवणीतून (सुनील सुतार) अशी अत्यंत महत्त्वाची पुस्तके त्यांनी केवळ दहा रुपयांत बाजारात आणली. छोट्या-छोट्या गावांतील मुलांच्या खिशात फार फार तर दहा रुपये असतात. हे पैसे खाऊवर खर्च न करता त्या रकमेतून मुलाने एखादे पुस्तक विकत घ्यावे, वाचावे म्हणून पुस्तकांची एक मालिकाच मासिक "ऋग्वेद'ने प्रकाशित केली. ज्यांचा मुद्रणखर्चदेखील दहा रुपयांपेक्षा जास्त आहे अशी पुस्तके ऋग्वेदने पदरमोड करून दहा रुपयांत बालवाचकांच्या हाती दिली. 

ऋग्वेद मासिकाने जुलैमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी दुसरे एक पाऊल उचलले. पॉकेट बुक ही नवी अभिनव योजना त्यांनी सुरू केली. केवळ पाच रुपयांत सत्तर ते ऐंशी पृष्ठांची पुस्तके या योजनेत प्रकाशित केली जाणार आहेत. एका (सुभाष विभुते) आणि देशोदेशीच्या कथा ही या योजनेतील दोन पुस्तके मागील महिन्यात बाजारात उपलब्ध झाली आहेत. पाच रुपयांत पुस्तक ही अविश्‍वसनीय वाटणारी बाब आजरा नावाच्या मराठी गावातून सुरू होतेय, कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय सुरू होतेय, ही स्वागतार्ह घटना आहे. बालकांविषयी आस्था असणाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे. 

मुद्दा केवळ पाच रुपयांत पुस्तक देण्याचा नाही. मुद्दा आहे, बालकांच्या हातात त्यांना आवडेल, वाचनाची रुची निर्माण करेल, अभिजात साहित्याची अभिरुची निर्माण होईल, असे पुस्तक देण्याचा. बालकांचा वयोगट आणि वर्तमानातील संधी यांची सांगड घालणारे पुस्तक मुलांच्या हाती पोचविण्याचा. मासिक ऋग्वेदने याबाबत ऐतिहासिक पाऊल उचलले आहे, याबाबत मात्र शंका नाही. 

(लेखिका लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT