pubg
pubg 
उत्तर महाराष्ट्र

"पबजी'मुळे काय घडलं धुळ्यात...

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मोबाईलवर वर्षापूर्वी "ब्लू व्हेल' गेमने धुमाकूळ घातला होता. त्यातून अनेक युवकांनी आत्मघातकाकडे पावले टाकली होती. यानंतर आता मेंदूचा ताबा घेणाऱ्या "पबजी' गेमने लहान विद्यार्थ्यांसह युवकांना वेड लावले आहे. त्याची नशा करून घेतल्यानेच येथील दोन विद्यार्थ्यांवर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार करण्याची वेळ आली असून, काही दिवसांपूर्वी 24 वर्षीय तरुणाने ट्रकखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच अनेक विद्यार्थी "पबजी'च्या आहारी गेले असून, त्यामुळे त्यांच्या पालकांसह शालेय व्यवस्थापनाची धडधड वाढली आहे. 

मोबाईलमध्ये चित्त; हीच ओरड 
"पबजी'मुळे विद्यार्थ्यांसह तरुणाईपुढे नवे संकट उभे राहिले आहे. यात आहारी जाणाऱ्या मुलांची संख्या ही नवीन समस्या ठरते आहे. पूर्वी "ब्लू व्हेल', "पॉकेमॅन', "कॅंडी क्रश', "क्वॉईन मास्टर' गेममध्ये बालकांपासून तरुणाई गुरफटली होती. आता त्यांच्यात "पबजी' अर्थात प्लेअर्स अननोन बॅटल ग्राउंड या ऑनलाइन मल्टिप्लेअर गेमची सर्व वयोगटांमध्ये क्रेझ आहे. मुले बाहेर खेळायला जात नाहीत. कुटुंबात किंवा शाळेत एकमेकांशी फारसा संवाद साधत नाहीत. मोबाईल गेम किंवा सोशल माडियामध्ये डोके, चित्त घालून असतात, अशी सार्वत्रिक ओरड आहे. तासन्‌तास अनेक विद्यार्थी "पबजी' गेममध्ये व्यस्त असल्याची माहिती शहरातील काही नामांकित शाळांनी केलेल्या पाहणीतून समोर आली आहे. 

स्वास्थ्यावर विपरीत परिणाम 
"पबजी' किंवा तत्सम मोबाईल गेममुळे आरोग्यासह मानसिकतेवर होणारे वाईट परिणाम समाजासमोर येत आहेत. रात्री उशिरापर्यंत गेममध्ये गुरफटल्याने जागरण, चिडचिडेपणा, दृष्टिदोष, मान व पाठदुखी, स्थूलपणा, स्वभावावर परिणाम होत दिसून येत आहे. एकलकोंडा विद्यार्थी अशा गेमच्या अधिक आहारी जात असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे सांगणे आहे. अशात "पबजी'सारख्या गेममुळे, त्यातील जय व पराजयामुळे राज्यात काही ठिकाणी विद्यार्थी, युवकांनी आत्मघात करून घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेच पालक, शाळांची धडधड वाढते आहे. 

काय आहे "पबजी'? 
नाद लावणाऱ्या "पबजी' गेमसाठी चार "जीबी रॅम'चा मोबाईल लागतो. त्यासाठी दीड "जीबी डेटा' खर्च करावा लागतो. या गेममध्ये युद्ध करावे लागते. एक व्यक्ती किंवा चार जणांच्या समूहाने हा गेम खेळता येतो. गेममध्ये "टार्गेट' पूर्ण करताना नवनवीन शत्रू सैनिकांना मारावे लागते. गेममध्ये जिवंत राहण्यासाठी एकमेकांना वाचविण्यासाठी संभाषणाचीही सोय आहे. यात "टार्गेट' पूर्ण करताना गेम खेळणारे तासन्‌तास गुरफटलेले असतात. या नादात ते मानसिक स्वास्थ गमावून बसतात. 

काय घडलं धुळ्यात? 
धुळे शहरातील एका नामांकित शाळेतील आठवीचा विद्यार्थी "पबजी'मध्ये गुरफटला. तो सायंकाळपासून पहाटेपर्यंत मोबाईलवर हा गेम खेळत असताना त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनावर परिणाम करून घेतल्याने संबंधित विद्यार्थ्याला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याच गेममुळे एका मानसोपचार तज्ज्ञाकडे 20 वर्षांच्या विद्यार्थ्यावर उपचार सुरू झाले आहेत. एका शाळेत गटागटाने सातवीपासूनचे विद्यार्थी "पबजी' खेळताना आढळले. त्यांचे समुपदेशन, प्रबोधन केले जात आहे. घडत असूनही वाच्यता नसल्याने काही प्रकार उजेडात येऊ शकलेले नाहीत. त्यातच शहरात एका तरुणाने काही दिवसांपूर्वी ट्रकखाली आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. तोही "पबजी'च्या आहारी गेला होता, असे बोलले जाते. 
 
"पबजी'सारख्या गेममुळे मानसिक संतुलन बिघडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे "सायकॉसीस'चे रुग्ण उपचारासाठी येतात. "पबजी'मुळे किंवा अशा खेळामुळे वेडसरपणा आल्यानंतर आत्मघाताकडे पावले पडण्याची दाट शक्‍यता असते. पालकांनीच मुलांना मोबाईल देऊ नये आणि दिला तर गेम डिलीट करावे. पाल्यावर कटाक्षाने लक्ष ठेवावे. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचे टाळावे. सतत मोबाईल हाताळणीमुळे आरोग्याच्या समस्या उद्‌भवतात. ते ओळखून स्वतःची स्वतःला आचारसंहिता घालून घ्यावी. 

-डॉ. प्रवीण साळुंखे, मानसोपचार तज्ज्ञ, "प्रयाग', धुळे 


पालकांनीच पाल्यावर लक्ष ठेवले पाहिजे. दिवसभर आणि रात्री झोपेपर्यंत काय करतात ते जाणले पाहिजे. तरीही बरेच पालक शिक्षकांवरच "बर्डन' टाकतात. विद्यार्थी शाळेमध्ये मोबाईल गेम खेळणार नाही याची पुरेपूर दक्षता संबंधित शालेय व्यवस्थापन घेत असते. नंतर घरी आल्यावर किंवा मित्रांकडे गेल्यावर पाल्य काय करतो त्यावर पालकांचे लक्ष असले पाहिजे. काही पालक पाल्याला मोबाईल किंवा टॅब देतात आणि फिरायला जातात. त्यामुळे पाल्य गेमच्या आहारी जाऊ शकतो. सातवी ते दहावीपर्यंतच्या पाल्यावर विशेष लक्ष ठेवावे. 

-फादर डॉ. सिजन थॉमस, प्रिन्सिपल, चावरा पब्लिक स्कूल, धुळे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT