उत्तर महाराष्ट्र

"एकदिला'ने वाढलेला भाजप "बेदिली'कडे..! 

सचिन जोशी

भाजपच्या जळगावातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यात आमदारांविरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला गेला.. हा प्रकार केवळ एक निमित्त आहे.. अनेक वर्षे विरोधात राहून केवळ संघटनाच्या जोरावर संघर्ष करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील "शतप्रतिशत' भाजपला कॉंग्रेसच्या धर्तीवरील गटबाजीने गेल्या काही वर्षांत किती पोखरले, त्याचे हे उदाहरण. कमी-अधिक प्रमाणात जिल्हा भाजपतील हे सार्वत्रिक चित्र. विरोधक "स्ट्रॉंग' नसले तरी भाजपतील अंतर्गत बेदिली इतकी तीव्र आहे की, तीच भाजपला येणाऱ्या निवडणुकीत तापी-गिरणाचे "पाणी' दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे मानले जात आहे.. 
 
एरवी, अनेक वर्षे विरोधात असताना एकसंधपणे कॉंग्रेस आघाडीवर तुटून पडताना भाजपचा "एकदिली' संघर्ष खानदेशवासियांनी अनुभवला आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून, विशेषत: केंद्र व राज्यात सत्ता आल्यानंतर जळगाव जिल्हा आणि शेजारच्या धुळे जिल्ह्यातही भाजपत गटबाजीचे दर्शन घडू लागले आहे. आता त्याला सत्ताप्राप्तीचे समाधान म्हणावे, आनंद की उन्माद? हा प्रश्‍नच आहे. शक्तीकेंद्र प्रमुखांच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंनी पक्षात "गट-तट काही नाही' असे कितीही बजावले असले तरी वास्तव वेगळेच अन्‌ भयानक आहे. 

मुळात, भाजप हा "केडरबेस्ड्‌' पक्ष मानला जातो. मंडळ, बूथरचना व पर्यायाने संघटन हे भाजपचे सर्वाधिक मोठे बलस्थान. आतापर्यंत पक्षाची वाटचाल याच केडरच्या बळावर झाली.. जळगाव जिल्हा तर भाजपच्या दृष्टीने आदर्श. गेली अनेक वर्षे सर्वाधिक सदस्यसंख्या राखणाऱ्या जळगाव भाजपने खासदार, आमदारांसह "मिनीमंत्रालय' जिल्हापरिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राखलेले.. केंद्र व राज्यात विरोधात असतानाही केवळ नेत्यांनी आवाज दिला तरी एकदिलाने जमा होणारे, प्रसंगी सरकारवर तुटून पडणाऱ्या भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांवर गेल्या पंधरा- वीस वर्षांपासूनचे आंदोलनांचे खटले प्रलंबित आहेत. 

परंतु, पक्षाचे हेच बलस्थान आता गेल्या साडेचार वर्षांत डळमळीत झाले आहे. सत्तेतील पक्षाकडे ओढा या समीकरणानुसार अनेकजण भाजपत आले, आणि त्यातून पक्षात निष्ठावंत व उपरे असा वाद सुरू झाला. याआधीही तो होताच, पण अगदीच मर्यादित स्वरूपात. राज्यात तो सार्वत्रिक आहे, तसा जळगाव जिल्ह्यातही. जळगाव महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने "आपले आणि उपरे' हा संघर्ष प्रकर्षाने जाणवला. आजही तो आहेच, उलटपक्षी तीव्र होतोय. मुक्ताईनगर-जामनेरातील वर्चस्वाने पक्षात उघड दोन गट पडले. समन्वयासाठी पालकत्व स्वीकारलेल्या कोल्हापूरकर दादांचा तिसरा गट निर्माण झाला. परंतु, या गटातटाने भाजपतील एकजुटीची भिंत अक्षरश: हलवून सोडली आहे. 

खडसेंच्या मंत्रिमंडळातील राजीनाम्यानंतर तर पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्येच एकमेकांकडे संशयाने पाहण्याची स्पर्धा सुरू झाली. धुळ्यात मंत्री, नेतृत्वाविरोधात आमदारांचे बंड, जळगावात लोकप्रतिनिधीची अश्‍लील क्‍लीप व्हायरल होणे, त्यापाठोपाठ जळगावातील आमदारांविरोधात बैठक... हा घटनाक्रम योगायोग तर नक्कीच नाही. त्यामागे पक्षांतर्गत धुसफूस किती शिगेला गेलीय, हे दिसून येते. इतर मतदारसंघात असं चित्र नाही, हे कुणी छातीठोकपणे सांगू शकेल का? तर त्याचे उत्तर "नाही' असेच आहे. मोदी-फडणवीसांच्या सभेला गर्दी होणे वेगळे आणि ते निघून गेल्यानंतर भाऊ, दादा, बापू, मामा यांच्या समर्थकांमधील संघर्ष वेगळा.. त्यामुळे पराभवाला विरोधक "स्ट्रॉंग' असणे गरजेचे नाही. आपल्या तंबूतील खुंटेच खिळखिळे झाले की, विरोधकांच्या धक्‍क्‍याची गरज राहणार नाही... तंबू खाली पडणारच.. हे वास्तव भाजपला कधी उमगेल?
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT