उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या पहिल्या बिनविरोध महापौर रंजना भानसी

सकाळवृत्तसेवा

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रंजना भानसी यांची महापालिकेच्या पंधराव्या महापौरपदी, तर प्रथमेश गिते यांची उपमहापौरपदी निवड झाली. महापौर, उपमहापौर पदासाठी प्रथमच बिनविरोध निवड झाली. शिवाय अनुसूचित जमाती प्रवर्गाला त्यातही महिलेला प्रथमच महापौर होण्याची संधी मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आदिवासी महिलेला मिळालेली संधी व भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन माघार घेतल्याने निवडीचा मार्ग सोपा झाला. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.


महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांचा पक्षाचा महापौर व उपमहापौर होणार हे निश्‍चित होते. परंतु, माघार घेण्यापेक्षा लढून पराभूत होणे कधीही चांगले या उद्देशाने काँग्रेसने महापौरपदासाठी आशा मानकर-तडवी, तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा पगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काल रात्री उशिरापर्यंत लढायचेच म्हणून छातीठोकपणे दावा केला जात असताना आज सभागृहात लढण्याऐवजी माघार घेणे पसंत केले. सकाळी अकरा वाजता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली.

सर्वप्रथम सभागृहात माजी महापौर अशोक मुर्तडक दाखल झाले. त्यापाठोपाठ सुरेखा भोसले वगळता मनसेचे सर्व नगरसेवक दाखल झाले. भोसले प्रकृती अस्वस्थतेमुळे सभागृहात येऊ शकल्या नाहीत. त्यानंतर भाजपचे सर्व नगरसेवक घोषणा देत सभागृहात दाखल झाले. भाजप व मनसे वगळता अन्य सदस्य हजर नसल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग त्याचवेळी मोकळा झाला होता. प्रक्रिया सुरू होऊन अर्धा तास उलटल्यानंतर शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभागृहात हजर झाले. प्रथम अर्ज छाननी, त्यानंतर माघारीसाठी दहा मिनिटे वेळ देण्यात आला.

त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह आमदार अपूर्व हिरे, वसंत गिते यांनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले. शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, काँग्रेसचे शाहू खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार, मनसेचे सलीम शेख, गुरुमित बग्गा यांच्यासह अँटीचेबंरमध्ये चर्चा झाल्यानंतर माघारीचा निर्णय झाला. प्रथम काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार आशा तडवी यांनी माघार घेतल्यानंतर एकमेव रंजना भानसी यांचा अर्ज शिल्लक राहिल्याने महापौरपदावर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा पगारे यांनी माघार घेतल्याने उपमहापौरपदी प्रथमेश गिते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

हस्तांदोलन अन् अश्रू
महापौरपदी घोषणा होण्यापूर्वी परंपरेप्रमाणे रंजना भानसी यांनी विरोधी सदस्यांशी हस्तांदोलन करत महापौरपदासाठी मदत करण्याचे आवाहन केले. महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर शहर विकासाचे धोरण त्यांनी स्पष्ट करताना आतापर्यंत ज्यांनी मदत केली त्यांचे ऋण व्यक्त केले. कै. बंडोपंत जोशी, कै. गणपतराव काठे, कै. दादासाहेब वडनगरे, वडील माजी खासदार कै. कचरुभाऊ राऊत यांना अभिवादन करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

वीस वर्षांपूर्वी इच्छा नसताना जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनावरून निवडणूक लढविली व विजयी होत गेले. आतापर्यंतच्या विजयाची परिणिती महापौरपदापर्यंत पोचण्यात झाली. चूल व मूल यापुरते मर्यादित असलेल्या एका महिलेला पक्षाने एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचविल्याचे सांगत असतानाच नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी यांनी सभागृहात अश्रू अनावर झाले.
---
सब का साथ सबका विकास भाजपचे धोरण आहे. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभाराचा नाशिककरांना दिलेल्या विश्‍वासाला तडा जावू देणार नाही. शहराच्या विकासासाठी कटीबध्द राहू, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्या माध्यमातून निधी आणण्यासाठी प्रयत्न करू, महापालिकेचे किकवी धरण, घंटागाडी प्रकल्प, बंद पडलेले पथदीप यात सुधारणा करू, सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून शहर स्वच्छ व सुंदर करू.

- रंजना भानसी, महापौर.

स्मार्ट सिटी साकारण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून प्रयत्न करू, भयमुक्त नाशिकसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवू, वाढते अतिक्रमण हटवू, पार्किंग, स्वच्छता, हरित नाशिक, स्वच्छ व सुंदर नाशिकसाठी प्रयत्न करू. गोदावरीसह नासर्डी व वालदेवी नदीचे प्रदुषण दुर करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

- प्रथमेश गिते, उपमहापौर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT