नाशिक

३ कोटी ७२ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील संशयित मोकाटच

CD
पावणेचार कोटींच्या फसवणुकीतील संशयित मोकाटच सोशल मीडियावर सक्रिय; पोलिसांना सापडेना, तलरेजा मुख्यमंत्र्यांची घेणार भेट सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : शहरातील संत बाबा हरदासराम संकुलातील महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी दाखवून तीन कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन दोन महिने उलटले, तरी संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. विशेष म्हणजे, या गुन्ह्यातील संशयित खुबचंद साहित्या सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ पोस्ट करून सक्रिय असल्याचा दावा फिर्यादी सुरेश तलरेजा यांनी केला आहे. देशभरातील विविध शहरांत फिरून व्हिडिओ बनविणारा संशयित पोलिसांना मात्र सापडत नसल्याने तपासाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे तलरेजा यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सुरेश नंदलाल तलरेजा (वय ६३, रा. गणपतीनगर) हे हॉटेल व इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय करतात. शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक २१२५/७ वरील संत बाबा हरदासराम व्यापारी संकुलातील दुकाने व कार्यालय विक्रीसाठी असल्याची जाहिरात पाहून त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाबाबत चौकशी केली होती. सुरुवातीला महापालिकेची बांधकाम परवानगी नसल्याने त्यांनी व्यवहारास नकार दिला. मात्र, संशयितांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची सही व शिक्का असलेले बांधकाम परवानगीचे बनावट पत्र दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध व्यवहारांतून तलरेजा यांनी तीन कोटी ७२ लाख रुपये दिले. जागेचा ताबा मिळाल्यानंतर त्यांनी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून कार्यालय आणि रीडिंग रूम सुरू केली. मात्र, महापालिकेकडे चौकशी केली असता तिसऱ्या मजल्याच्या बांधकामास कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातच तलरेजा यांच्या ताब्यातील जागा कागदपत्रांमध्ये ओपन टेरेस दाखवून मुंबईतील कंपनीच्या नावावर परस्पर विकण्यात आल्याचेही समोर आले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध ६ सप्टेंबरला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. के. पी. इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोप्रायटर ममता अनिल साहित्या, अनिल खुबचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, नितीन खुबचंद साहित्या, जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रा. लि. आणि कंपनीचे संचालक विशाल रामगोपाल शर्मा यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. चौकट मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी तीन कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक होऊनही न्याय मिळत नसल्याने आपण हतबल झालो आहोत. न्यायव्यवस्थेवर विश्वास असला, तरी पोलिसांच्या संथ तपासामुळे विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देणार असून, संशयितांना तातडीने अटक करून न्याय मिळवून देण्याची मागणी करणार असल्याचे तलरेजा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

SCROLL FOR NEXT