Nashik News : निसर्गकवी ना. धो. महानोर यांनी शेतकऱ्याचे सुखदुःख मांडताना अतिशय समर्पक शब्दात ‘या नभाने या भुईला दान द्यावे’ असे सांगत त्याची आर्त हाक शब्दबद्ध केली आहे. शेतकरी हा कर्ज कुणाकडे मागणार, त्यापेक्षा तो निसर्गालाच साद घालतो.
अगदी तशीच वेळ सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. कुठे पाऊस आहे तर कुठे अजिबातच नाही, जेमतेम पावसावर केलेली पेरणी वाया जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरीही महानोरांच्या कवितेतील पक्तिद्वारे पावसाला दररोज आवाहन करीत आहे.
एकीकडे दुष्काळाची चाहूल अन दुसरीकडे पिकांवर केलेला खर्च, तरीही तो पावसाला विनवणी करीत आहे. पण पाऊस काही त्याची हाक ऐकायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी पावसाअभावी करपणाऱ्या पिकांवर नांगर फिरवू लागला आहे. (absence of rain farmers plow on maize crop at pimpri Nashik News)
पिंपरी येथील अशाच एका शेतकऱ्याने नाइलाजाने आपल्या एक एकरातील मक्यावर नागर फिरवीत आपली व्यथाच पावसासमोर मांडली आहे.
रिमझिमवर पडणाऱ्या पावसावर पेरणी केली खरी पण अजूनही पाऊस रिमझिम स्वरूपातच पडत आहे.
परिणामी दोन महिन्याचे पीक होऊनही अपेक्षित वाढ होत नसल्याने पिंपरी येथील शेतकऱ्याने एक एकरमधील मक्याच्या क्षेत्रावर नांगर (रोटावेटर) फिरविला. पाऊस लांबल्याने इतर पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
तालुक्यात अद्यापही मुसळधार पाऊस पडलेला नसल्याने नदी, नाले, विहिरी कोरडेठाक आहे. त्यातच जूनच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी रिमझिम पावसावर पेरणीचा जुगार खेळला खरा, मात्र ही पेरणी आता हिरवीगार होऊनही धोक्यात सापडत आहे.
विशेषतः जमिनीत पुरेशी ओल नसल्याने मका, कपाशी, सोयाबीन आदी सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे.
तालुक्यात आतापर्यंत खरिपाची सुमारे ७० हजार हेक्टरच्यावर पेरणीचा आकडा पोहोचला आहे. विशेष म्हणजे यातील तब्बल ३८ हजार हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे.
वाढत्या मागणीमुळे हक्काचे पीक म्हणून तालुक्यात मका पुढे येत असतानाच थांबलेल्या पावसामुळे पीक संकटात सापडले आहे.शिवाय मक्यावर अळीचा प्रादुर्भाव देखील वाढू लागला आहे.
त्यातच डोळ्यासमोर पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून फवारणीसह खते व मशागतीचा हजारो रुपयांचा खर्च देखील शेतकरी शाश्वती नसताना करत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याचमुळे वैतागलेल्या पिंपरी येथील शेतकरी अशोक गुंड व शेतकरी मंगेश पानसरे यांनी आपल्या दोन महिन्याच्या एक एकर मका पिकावर रोटावेटर चालून संपूर्ण पीक नष्ट केले आहे.
लागवडीसह आतापर्यंत वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च करूनही मक्याचे शेतातच नुकसान होत असल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यानी हे टोकाचे पाऊल उचलत संताप व्यक्त केला आहे.
हातचे पीक गेल्याने या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी पिंपरी येथील शेतकरी करत आहेत. मकाचे पीक नांगरल्याने या शेतात आता पाऊस पडल्यावरच पुढच्या पिकाचे तयारी शेतकऱ्यांना करता येणार आहे.
तालुक्यातील विविध गावात देखील मका व इतर पिकांची परिस्थिती वाईट आहे. काही ठिकाणी अळीचा प्रादुर्भावही वाढला आहे तर काही ठिकाणी पीक सुकू लागले आहे. त्यामुळे मकासह बाजरीचे पीक अर्ध्यावरच नांगरण्याची तयारी देखील अनेक शेतकऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येते.
"निसर्गाने यावर्षी खरिपाचे मोठे नुकसान केले आहे. दोन महिन्याचे पीक होऊही ते येण्याची शाश्वती नसल्याने व आता मोठा खर्च करावा लागत असल्याने नाइलाजाने टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. शासनाने बियाण्यांचे दर कमी करून शेतीमालाला योग्य भाव देण्याचे धोरण निश्चित करावे." - मंगेश पानसरे, शेतकरी
"अगोदरच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्याचे मरण होत आहे. त्यातच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडत आहे. पाऊस लांबल्याने पिकांचे नुकसान होण्याची आपत्ती ओढवली आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी होण्याची स्थिती असून खरिपातील पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी." - हरिभाऊ महाजन, अध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.