NSK26H34185, NSK26H34186
भोकर (ता. जळगाव) : दरोड्याच्या घटनेनंतर स्टेट बँकेबाहेर जमलेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात पिस्तूलचा धाक दाखवून दुचाकीवरून रोकडच्या बॅगा घेऊन पळणारा दरोडेखोर.
---
स्टेट बँकेच्या भोकर शाखेवर सशस्त्र दरोडा
---
व्यवस्थापक, रोखपालला बांधून रोकडसह दागिने लंपास
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : भोकर (ता. जळगाव) येथील स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी (ता. ३१) दिवसा दुपारी अडीचच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. चार सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करून कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखून रोख रखमेसह सोने लुटून नेले. इतकेच नाही, तर शाखा व्यवस्थापक आणि रोखपालास बेदम मारहाण करून खुर्चीला बांधून पसार झाले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा भोकर गावात दाखल झाला.
स्टेट बँकेच्या भोकर शाखेत दुपारी चार ते सायंकाळी पाच शसस्त्र दरोडेखोर दाखल झाले व त्यांनी बँक कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कर्मचारी हबकले. दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापक जयेश राणे आणि रोखपाल रणजित मराठे यांना मारहाण केली व दोघांनाही खुर्चीला बांधून ठेवले. त्यानंतर रोकड आणि सोने बॅगांमध्ये भरण्यास सुरुवात केली. बँकेतील इतर कर्मचाऱ्यांवर एक- दोन दरोडेखोरांनी पिस्तूल रोखून धरल्याने त्यांना हालचाल करता येत नव्हती. रोकड व सोने बॅगेत भरून दरोडेखोरांनी दुचाकींवरून पळ काढला. दरोडेखोर बँकेतून बाहेर पडताच श्री. मराठे यांनी बँकेचा अलार्म वाजविला आणि ग्रामस्थ व पोलिसांना माहिती दिली. भोकर गावातून निघणाऱ्या रस्त्यांवरील प्रत्येक गावाकडून मदत मागितल्याने किनोद, लिधूर, डिकसाई या गावातील तरुणांनी दुचाकींवरून दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, उपअधीक्षक नितीन गणापुरे, राहुल गायकवाड फौजफाट्यासह भोकरच्या दिशेने रवाना झाले.
डिकसईत रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे
दरोडेखोर जळगावच्या दिशेने पळून जात असताना, किनोद गावातील तरुणांनी दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने दुचाकी अंगावर घातल्याने त्याच्यावर रॉड भिरकावून मारला, तोही वाचवून सुसाट दुचाकीने दरोडेखोर पसार झाला. मात्र, डिकसाई ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर ट्रॅक्टरसह ट्रॉली आडवी लावून मार्ग अडविला. तेथे एक दरोडेखोर पकडला गेला, तर त्याचा साथीदार शेतात पळून गेला. इतर दोघे दुचाकीने पसार झाले. पळून गेलेल्या दोघांना धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथे रेल्वे पुलाखाली पकडण्यात यश आले.
सोन्याने भरलेल्या पाच बॅगा, एकीत रोकड
दरोडेखोरांशी झटापटीत त्यांच्या बॅगा पडल्या. त्यात एका बॅगमध्ये रोकड, तर पाच बॅगांमध्ये बँकेत गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने होते. शंकर रमेश जासक (वय ४२, रा. खेडी, इस्कॉन मंदिराजवळ), गजानन राजेंद्र पवार (३२, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी दरोडेखोरांची नावे आहेत. उर्वरित दोघांना रात्री ताब्यात घेत पोलिस पथक जळगावला रवाना झाले.