अंनिसच्या दणक्याने ज्योतिषाचा माफीनामा
पंचवटीतील प्रकार; पोलिसांच्या चौकशीनंतर असे कृत्य न करण्याचे लेखी आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : नकारात्मक ऊर्जा नष्ट करून कार्यसिद्धी होण्याचा दावा करत अवघ्या पाच पैशांच्या काळ्या धाग्याची नऊशे रुपयांना विक्री करणाऱ्या पंचवटीतील एका ज्योतिषाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) दणका दिला. अंनिसने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित ज्योतिषाने माघार घेत यापुढे असे कृत्य करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संबंधित ज्योतिषाने मंत्रसिद्ध केलेला काळा धागा उजव्या मनगटावर बांधल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कार्यसिद्धी होते, असा दावा समाज माध्यमांवर केला होता. तसेच या धाग्यामुळे अनेकांना लाभ झाल्याचे कथित पुरावे व्हॉट्सॲप स्टेटसवर प्रसारित केले होते. या प्रकाराची दखल घेत अंनिसने संबंधित दाव्यांवर आक्षेप नोंदवला. मंत्रशक्तीचा दावा वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध करण्याचे आव्हान देत पंचवटी पोलिस ठाण्यात निवेदन दिले. निरीक्षक सुनील पवार यांनी संबंधित ज्योतिषाला पोलिस ठाण्यात बोलावून त्याची चौकशी केली. त्यानंतर अंनिसचे कार्यकर्ते, पोलिस आणि संबंधित ज्योतिषी यांच्यात चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समुपदेशन केले. व्यवसायवाढीसाठी चुकीच्या पद्धतीने हे कृत्य केल्याचे त्याने मान्य केल्याचे अंनिसकडून सांगण्यात आले. यापुढे असे कृत्य करणार नसल्याचे त्याने लेखी दिले. दरम्यान, फलज्योतिष हे विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध केल्यास २१ लाख रुपये जिंकण्याचे आव्हानही अंनिसने संबंधित ज्योतिषाला दिले. मात्र, त्याने हे आव्हान स्वीकारले नाही, असे समितीने स्पष्ट केले. या कारवाईमुळे नागरिकांची संभाव्य फसवणूक रोखण्यास मदत झाल्याचा दावा अंनिसने केला आहे. या वेळी अंनिसचे कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्री, प्रा. आशा लांडगे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे आणि रंजन लोंढे उपस्थित होते. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी अंनिस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.