NSK26H34160
भोकर : स्टेट बँकेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या स्थळाची पाहणी करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी.
--------
भोकर बँक दरोड्याच्या मुळाशी जा
पालकमंत्र्यांकडून बँकेची पाहणी; सखोल तपासाचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : भोकर येथील भारतीय स्टेट बँकेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करावी, गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिले.
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर स्वतः भोकर येथील बँकेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. बँक व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी संशयिताना पकडण्यासाठी धाडस दाखवणाऱ्या विदगाव, भोकर व डिकसाई येथील तरुण व ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. तसेच अल्पावधीतच परिसर पिंजून काढत संशयितांना पकडण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करणारे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या संपूर्ण पथकाचेही कौतुक केले. बँक व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धैर्याचे आणि दरोडेखोरांना केलेल्या प्रतिकाराचेही त्यांनी कौतुक केले.
यावेळी जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) शनितीन गणापुरे, जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील, बँक व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी, भोकर येथील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
‘सतर्क राहून पोलिसांना माहिती द्या’
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी परिसरात शोधमोहीम राबवत असताना पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तपासाचा आढावा घेतला. यापुढेही नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींबाबत सतर्क राहून त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.