नाशिक : कोरोनामुक्तीच्या मार्गात म्युकरमायकोसिस (mucomycosis) बुरशीजन्य आजाराने आरोग्य क्षेत्रात नवी समस्या निर्माण केली आहे. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी स्थापन तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सने म्युकरमायकोसिसपासून बचावासाठी मार्गदर्शकाची भूमिका निभवावी. टास्क फोर्सच्या माध्यमातून आलेल्या प्रभावी सूचनांच्या अंमलबजावणीसोबतच शिफारशी शासनाला वेळोवेळी कळवल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. १५) दिली. (Bhujbal said that the task force should play a guiding role in preventing mucomycosis)
टास्क फोर्सने या आजाराच्या जनजागृतीच्या सूक्ष्म नियोजनातही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. भुजबळ फार्म येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, महापालिका वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. आवेश पलोड, डॉ. संजय गांगुर्डे, विषय तज्ज्ञ व समिती सदस्य डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. पुष्कर लेले, डॉ. प्रदीप गोंधळे, डॉ. मनीष बापये, डॉ. भारत त्रिवेदी उपस्थित होते.
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजार वेगाने वाढत आहे. आजार होऊ नये आणि झाल्यास रुग्ण बरा करण्यासाठी काय करावे लागेल, असे दुहेरी नियोजन टास्क फोर्सने करावे. या आजाराशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा व औषध सामग्री पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आणखी तज्ज्ञांची आवश्यकता असल्यास, त्यांनादेखील टास्क फोर्समध्ये सहभागी करून घेण्याचे त्यांनी नमूद केले.
सहा ठिकाणी मॉडेल ऑपरेशन थिएटर
म्युकरमायकोसिसचा संभाव्य धोका लक्षात घेता रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज करताना या आजाराच्या लक्षणांची चेक लिस्ट सोबत द्यावी. लक्षणे आढळल्यास तत्काळ कान-नाक-घसातज्ज्ञांकडून उपचार करून घेण्याची सूचना प्रत्येक रुग्णालयाने कराव्यात. प्रत्येक कोविड रुग्णालयांना टास्क फोर्समार्फत काय करावे व काय करू नये, याबाबत माहिती जारी करावी. या आजारासाठी आवश्यक असलेल्या मॉडेल ऑपरेशन थिएटर जिल्हा सामान्य रुग्णालय, मालेगाव रुग्णालय, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. झाकिर हुसेन, बिटको रुग्णालय आणि एसएमबीटी रुग्णालय या सहा ठिकाणी कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.
(Bhujbal said that the task force should play a guiding role in preventing mucomycosis)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.