एन्कर
------------------
स्वीकृत नगरसेवक नियुक्तीत भाजपवर संशय
शिवसेने (उबाठा) कडून उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असताना, आता या नियुक्तीवरून पुन्हा राजकारण तापले आहे. शुक्रवारी (ता. २०) महासभेत नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्याची औपचारिकता बाकी असताना, शिवसेना (उबाठा) ने मुंबई उच्च न्यायालयात पूर्वसूचना अर्ज (कॅव्हेट) दाखल केला आहे. या प्रकरणात कोणतीही याचिका, अर्ज अथवा न्यायालयीन कार्यवाही दाखल झाल्यास आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही आदेश पारित करू नये, अशी विनंती या अर्जाद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे.
शिवसेना (उबाठा) गटनेते केशव सीताराम पोरजे तसेच स्वीकृत नगरसेवकपदाचे उमेदवार हेमंत गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांच्यातर्फे हा पूर्वसूचना अर्ज दाखल करण्यात आला. यासंदर्भात शिवसेनेचे (उबाठा) ॲड. विनोद महाडीक यांनी काँग्रेस नगरसेवक सुफियान जिन आणि भाजपचे सुनील आडके यांना नोटीस बजावली आहे. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नामनिर्देशन, मंजुरी अथवा नियुक्तीसंदर्भात संबंधित व्यक्तींकडून किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीकडून रिट याचिका, अर्ज अथवा अन्य न्यायालयीन कार्यवाही दाखल होण्याची शक्यता असल्याचे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. न्यायालयात सुनावणी झाल्यास बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.
----------------चौकट
वाद नेमका काय?
स्वीकृत नगरसेवकपदावरून शहर विकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) व काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. संख्याबळानुसार शिवसेने (उबाठा) कडून हेमंतकुमार गायकवाड व बाबासाहेब गायकवाड यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र काँग्रेसला यातील एक जागा हवी होती. ठाकरे सेनेने काँग्रेसची मागणी धुडकावल्यानंतर भाजपचे सुनील आडके यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी टपालाद्वारे दाखल केला. मात्र ठाकरे सेना गटनेत्यांचा प्रस्ताव ग्राह्य धरतं जीन यांच्याकडून आडके यांचा सादर झालेला प्रस्ताव निकाली काढण्यात आला. प्रशासनाने भाजपचे सहा, ठाकरे सेनेचे दोन व शिवसेनेचे दोन असे एकूण दहा नावांचे प्रस्ताव अंतिम केले आहेत. शुक्रवारी महासभेत नियुक्तीची औपचारिकता राहिली असताना ठाकरे सेनेचा एक उमेदवार नाकारून सातवा म्हणजे भाजपचे आडके यांचे नाव घुसविण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या संशयावरून हा पूर्वसूचना अर्ज दाखल करण्यात आला आहे.
--------कोट----------
काँग्रेसला हाताशी धरून न्यायालयीन वाद उभा करण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाल्यास आपल्याला उपस्थित राहून बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचा दावा पूर्वसूचना अर्जाद्वारे करण्यात आला आहे.
- केशव पोरजे, गटनेते, शिवसेना (उबाठा).
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.