फोटो क्रमांक ः 33249
चौगाव ः बुलेटच्या कारणावरून सुरू असलेली दगडफेक.
---
बुलेटच्या आवाजावरून चौगाव पेटले
-
धुळे तालुक्यात दोन गटांत तुफान राडा; कुऱ्हाड, रॉडने मारहाण
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ ः चौगाव (ता. धुळे) येथे बुलेटचा जोरात आवाज काढण्याच्या कारणावरून आणि पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून १६ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे चौगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कुऱ्हाड आणि विटांच्या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून या गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
-
तालुका पोलिसांनी सांगितले, की २० ऑक्टोबरला रात्री साडेसात ते आठच्या सुमारास चौगाव येथील तक्रारदार सुनील सुधाकर खैरनार (वय २२) यांच्या घरासमोर संशयितांनी बुलेट थांबवून जोरात आवाज काढला. या प्रकाराचा निषेध केला असता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयितांपैकी एकाने हातातील कुऱ्हाडीसारख्या हत्याराने सुनील खैरनार यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. तसेच बीच बचाव करण्यासाठी आलेले रमेश बारकू बोरसे आणि मनोहर बाजीराव खैरनार यांनाही लाथाबुक्क्यांनी व कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी फिर्यादी सुनील खैरनार यांच्या जबाबावरून नितीन बागले यांचा मुलगा, कमलेश मासोळे, सीताराम बागले यांचा मुलगा, कमलाकर गर्दे, सागर बागले, प्रमोद बागले, समाधान बागले आणि राकेश बागले (सर्व रा. चौगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार अमोल बोरसे तपास करत आहेत.
-
पूर्ववैमनस्यातून राडा
याच वादाची व पूर्ववैमनस्याची पार्श्वभूमी लक्षात घेता त्याच रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास चौगाव येथील विठ्ठल मंदिर चौकात पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले. मागील भांडणाची कुरापत काढून एका गटाने गैरकायद्याची मंडळी जमवली. सामायिक फिर्यादी सागर नितीन बागले (वय २१) याने दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांनी फिर्यादी, साक्षीदार व अन्य व्यक्तींना कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी सळई आणि विटांनी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सागर नितीन बागले व राहुल संजय बागले हा जखमी झाला. या प्रकरणी राहुल ज्योतिबा खैरनार, गोलू गोपीचंद खैरनार, दीपक गोपीचंद खैरनार, पवन ज्योतिबा खैरनार, भाऊसाहेब खैरनार, ज्योतिबा खैरनार, बाजीराव खैरनार आणि चेतन बाजीराव खैरनार (सर्व रा. चौगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार डी. एल. देवरे तपास करीत आहेत. एकाच गावात दोन गटांत झालेल्या या संघर्षानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या संशयितांवर गुन्हे नोंदविले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.