Corporator husband demands ransom Nashik News 
नाशिक

नगरसेविकेच्या पतीकडे मागितली खंडणी

खोटे अर्ज करून ब्लॅकमेल करणाऱ्याला पंचवटी पोलिसांची चपराक

सकाळ वृत्तसेवा

म्हसरूळ : शहरातील विविध पोलिस ठाण्यांकडे वारंवार खोटे अर्ज करून पंचवटीतील भाजपच्या नगरसेविकेच्या पतीकडे तब्बल १५ लाखांची खंडणी दिली नाही, तर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या संशयिताविरुद्ध पंचवटी पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पंचवटीतील भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने यांचे पती धनंजय ऊर्फ पप्पू माने यांना धमकावत संशयित अनिकेत निकाळे (रा. महालक्ष्मीनगर, हिरावाडी रोड, पंचवटी) याने पंचवटी पोलिस ठाण्यासह अन्य ठिकाणी खोटे अर्जफाटे केले होते. यात पप्पू माने यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचेही आरोप केले होते. त्यामुळे माने यांनी पोलिस ठाण्यात जाऊन यासंदर्भात जबाबही लिहून देत आरोपांचे खंडन केले होते.

मात्र, संशयिताने माने यांच्या मित्राची भेट घेत त्यांना सांगितले, की ‘तुझा मित्र पप्पू माने यांच्यावर जातिवाचक शिवीगाळ केली, म्हणून मी पोलिसांत तक्रार केली असून, लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे सांग. माने याने मला १५ लाख रुपये दिले, तर तक्रार मागे घेतो, त्यात तडजोड करीत सात ते आठ लाख रोख व माझा एक व्यक्ती महापालिकेत कामाला लावावा, अशी मागणी केली. यामुळे मंगळवारी (ता. ५) मित्राच्या मध्यस्थीने माने यांनी संशयिताची भेट घेत मला विनाकारण का त्रास देतोय, अशी विचारणा केली. त्यावेळी संशयिताने माने यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. यानंतरही संशयिताने माने यांच्या मित्राला वारंवार फोन करून रकमेची मागणी केली. अखेर संशयिताने माने यांना धमकावल्याने माने यांनी त्यास नवीन आडगाव नाका येथील ॲक्सीस बँकेच्या शाखेतून ५० हजार रुपये काढून दिले. मात्र, माने यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठत ही बाब व घडलेला प्रकार पंचवटी पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

कोरोनाकाळात माने दांपत्याने वाखाण्याजोगे काम केले आहे. यामुळे प्रभागात माने दांपत्याचा नावलौकिक वाढला होता. यामुळे राजकीय विरोधकांकडूनही अनिकेत निकाळेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन असे कृत्य केले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. खोटे अर्जफाटे करून माने यांचे राजकीय करियर संपविण्याचा घाट संशयिताने घातला होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिस प्रशासनाची सतर्कता आणि त्यांच्या समयसूचकतेमुळे खोटा गुन्हा दाखल करण्याचा संशयिताचा डाव फसला असून, एका सच्चा कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

पोलिस करणार सखोल चौकशी

निवडणुकांचा हंगाम सुरू झाला, की असे गैरप्रकार घडण्याची शक्यता असते. राजकीय वर्चस्वातूनही असे प्रकार घडतात. त्यामुळे नगरसेविकेच्या पतीकडे खंडणी मागत त्यांना बदनाम करण्याची धमकी देणे, ही बाब गंभीर असल्याचे सांगत पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी काही पुरावेही हस्तगत केले आहेत. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. पोलिस प्रशासनाला विनाकारण कामाला लावणारा संशयित अनिकेत निकाळे हा नेमके कुणाच्या सांगण्यावरून अर्जफाटे करीत होता. यात काही राजकीय व्यक्तींचा हात आहे का, या बाबीही सूक्ष्मपणे तपासल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

''सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. गुन्हा दाखल करताना सर्व पुरावे तपासून पाहिले. वेळ पडल्यास संशयिताचे ‘सीडीआर’ तपासणी करून या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. याबाबत जसे जसे पुरावे मिळत जातील, त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.''

-डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे

''गेल्या पाच वर्षांच्या काळात आम्ही पती-पत्नीने प्रभागात प्रामाणिकपणे केलेल्या कामांमुळे जनतेच्या मनात आमची जागा निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय विरोधकांनी असे कितीही कुभांड रचले, तरी काहीही फायदा होणार नाही. संबंधित व्यक्तीच्या मागे काही राजकीय विरोधक असून, ते इतक्या खालच्या थराला जातील, अशी अपेक्षा नव्हती. येत्या निवडणुकीत जनता जनार्दन त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. पोलिस प्रशासन आणि न्याय देवतेवर आमचा विश्वास असून, सत्याचा नेहमीच विजय होतो, हे पंचवटी पोलिस आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या सतर्कतेमुळे सिद्ध झाले आहे.''

-धनंजय (पप्पू) माने, तक्रारदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: धक्कादायक! गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण अन् साप...; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

SCROLL FOR NEXT