न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
जिल्ह्यात आजपासून कामावर रुजू होणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत आंदोलन चारही कर्मचारी महासंघांच्या विनंतीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी गुरुवार (ता. १९) पासून नियमित कार्यालयीन वेळेत कामावर हजर राहणार आहेत. याबाबत नाशिक जिल्ह्यातील चारही न्यायालयीन कर्मचारी संघटनांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच प्रमुख न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय यांना पत्राद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट-अ), महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलिफ कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य गट-ड न्यायालयीन कर्मचारी महासंघ यांच्या वतीने संपाची नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला होता.
दरम्यान, बुधवारी (ता. १८) दुपारी २.४५ वाजता ऑनलाइन झूम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी, न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती सुमन श्याम उपस्थित होते. चारही महासंघांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीचा सन्मान राखून १७ पासून सुरू असलेला बेमुदत संप तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे पत्र महासंघाकडून उशिराने प्राप्त झाले.
मात्र, हे पत्र प्राप्त होईपर्यंत सर्व संवर्गांतील न्यायालयीन कर्मचारी दिवसभर आंदोलनस्थळी उपस्थित होते. त्यानंतर नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण आणि साखळी उपोषणही सुरू असल्याने सर्व पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते. त्यामुळे महासंघाने घेतलेला संप स्थगितीचा निर्णय सर्व संवर्गांतील न्यायालयीन कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले नाही. परिणामी, बुधवारी कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहू शकले नाहीत. यापुढे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व तालुका स्तरांवरील न्यायालयांतील सर्व संवर्गांतील न्यायालयीन कर्मचारी आणि नाशिक कौटुंबिक न्यायालयातील सर्व कर्मचारी गुरुवार, १९ नोव्हेंबरपासून नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित राहतील, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या पत्रावर नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना (गट-अ) चे अध्यक्ष प्रमोद व. नागमोते आणि प्रमुख कार्यवाह शिवानंद पं. जाधव, महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, शाखा नाशिकचे अध्यक्ष प्रथमेश प्र. भडके आणि सचिव पंकज र. शेंडे, नाशिक जिल्हा न्यायालयीन बेलिफ संघटनेचे अध्यक्ष जयदेव अ. पवार आणि सचिव सुरेश पी. चौधरी, तसेच नाशिक जिल्हा न्यायालयीन (गट-ड) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लोटन ज. बैसाणे आणि सचिव केतन हि. कर्डक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.