दुष्काळात सिताफळ काळवंडली
---------------------------
पावसाअभावी फळांच्या पोषणावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
जुनी शेमळी, ता. १२ : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेली पाणीटंचाई आणि उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने जंगलातील सीताफळ काळवंडली आहेत. जंगलात नैसर्गिकरीत्या येणारी सीताफळे यंदा पाण्याअभावी आणि उन्हामुळे व्यवस्थित पोसली गेली नाहीत.
झाडांवरील फळे काळी पडून त्यांची वाढ खुंटल्याने सीताफळे खाण्यायोग्य अवस्थेत आली नाहीत. परिणामी दरवर्षी जंगलातून गोळा करून विक्रीसाठी आणली जाणारी सीताफळे यंदा बाजारपेठेत दिसेनाशी झाली आहेत अनेक डोंगराळ आणि वनक्षेत्रालगतच्या भागांत जंगलात नैसर्गिकरीत्या सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. पावसाळ्यानंतर या झाडांना फळे लागतात. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे जंगलातून सीताफळे गोळा करून स्थानिक बाजारपेठेत विक्री करतात. विशेषतः आदिवासी कुटुंबांसाठी जंगलातील हा रानमेवा हंगामी उत्पन्नाचे साधन ठरतो. मात्र, यंदा पावसाअभावी जंगलातील जमिनीतील ओलावा कमी झाला. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने सीताफळाच्या झाडांना नैसर्गिकरीत्या आवश्यक ओलावा मिळाला नाही.
परिणामी, जंगताली सीताफळांच्या झाडांवरील फळांची अपेक्षित वाढ झाली नाही. अनेक ठिकाणी फळे लहान अवस्थेतच काळी पडली. काही फळे पूर्णपणे पोसली गेली नसल्याने त्यांचा आकारही वाढला नाही. दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत जंगलातील सीताफळांचा हंगाम बहरात असतो. डोंगराळ भागातील नागरिक सकाळी जंगलात जाऊन सीताफळे गोळा करतात आणि गावातील तसेच परिसरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. यातून त्यांना दिवाळीच्या काळात काही प्रमाणात आर्थिक हातभार लागतो. मात्र, यंदा जंगलातच सीताफळांचे उत्पादन कमी झाल्याने विक्रीसाठी फळे उपलब्ध झाली नाहीत.
निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपिकांवरच नव्हे, तर जंगलातील नैसर्गिक रानमेव्यावरही होत असल्याचे यंदाच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. जंगलातील सीताफळांचा हंगाम हातचा गेल्याने रानमेव्यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण व आदिवासी कुटुंबांची यंदा निराशा झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.