Robbery at gunpoint in Dhakambe
Robbery at gunpoint in Dhakambe esakal
नाशिक

Nashik Crime Update : ढकांबेत पिस्तुलीचा धाक दाखवून धाडसी दरोडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ढकांबे (ता. दिंडोरी) येथे शनिवारी (ता. १२) पहाटे दरोडेखोरांनी रतन बोडके यांच्या ‘शिवकमल’ बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकत २८ तोळे सोन्यांसह साडेआठ लाखांची रोकड असा १७ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल लांबविला. सुमारे दोन तास सहा ते सात दरोडेखोर बंगल्यामध्ये बिनधास्त वावरत होते. मुद्देमाल चोरून दरोडेखोरांनी बोडके यांच्या कारमधून पोबारा केला.

रतन बोडके यांचा मानोरी शिवारात ‘शिवकमल’ नावाचा दोन मजली बंगला असून, दोघे भाऊ, त्यांचे कुटुंबीय व आईसमवेत ते राहतात. शनिवारी (ता. १२) पहाटे त्यांच्या बंगल्यावर सहा ते सात जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. संशयितांकडे पिस्तूल, चाकू हत्यारे होती. लहान मुलांवर पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली आणि घरातील २८ तोळे सोने, ४८० ग्रॅम चांदी आणि साडेआठ लाखांची रोकड असा सुमारे १७ लाख ३४ हजारांचा ऐवज घेऊन बोडके यांच्या क्रेटा कारमधून दरोडेखोरांनी पोबारा केला. (Daring robbery at gunpoint in Dhakambe 28 tolas of gold along with 17 lakh stolen Nashik Crime News)

दरोडेखोरांनी बंगल्यात शिरण्यापूर्वी बोडके यांच्या पाळीव कुत्र्याला गुंगीचे औषध दिल्याचे समोर आले आहे. दरोड्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह अपर अधीक्षक माधुरी कांगणे, कळवणचे उपविभागीय अधिकारी भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह दिंडोरीचे निरीक्षक प्रमोद वाघ यांनी धाव घेतली. दरोडेखोरांनी घरातील सामान अस्तव्यस्त केले होते. शोध पथके तयार करून संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. फिंगर प्रिंट ब्यूरो, डॉग युनिट, तांत्रिक विश्लेषण शाखा अशा तपास यंत्रना घटनास्थळी दाखल झाल्या असून, दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल झाला.

दिवाळी फराळावरही ताव

दरोडेखोरांनी दरवाजा वाजविला असता, मजूर आला असावा, असे समजून बोडके यांच्या आईने दरवाजा उघडला. दरोडेखोरांनी त्यांना पिस्तूल लावून गप्प केले आणि बंगल्यात शिरले. तर बोडके यांची १५ वर्षांची मुलगी जागी होऊन बाहेर आली असता, ती ओरडली. त्या वेळी एका दरोडेखोराने तिला दोन थापडी मारत गोळी मारण्याची धमकी दिली. रतन बोडके व त्यांच्या पत्नी खोलीतून बाहेर आले असता, दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. वरच्या मजल्यावर बोडके यांचे बंधू राहतात. तेही जिन्यातून खाली येत असताना त्यांनाही जिन्यातच अडविले. दरोडेखोरांच्या हातामध्ये पिस्तुली, धारदार हत्यारे, गज असल्याने बोडके कुटुंबीयांनी जास्त विरोध केला नाही. दरोडेखोरांनी घरातील सर्वांना पहिल्या मजल्यावरील एका बेडमध्ये बंद केले. बोडके यांनी रात्रीच टोमॅटो विकून आणलेली रोकड व घरातील रोकडे अशी साडेआठ लाखांची रोकड, २८ तोळे सोने, ४८० ग्रॅम चांदी असा १७ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज बोडके यांच्याच रोकडच्या बॅगेत भरला. खाली असलेल्या किचनमध्ये रात्रीची उरलेली वांग्याची भाजी, भात, पोळ्यांसह डब्यांमध्ये असलेला दिवाळी फराळावरही दरोडेखोरांनी ताव मारला. तसेच, जाताना काजू, बदामही घेऊन गेले. बोडके यांनी दसऱ्यालाच घेतलेल्या क्रेटा कारची (एमएच- १५- एचवाय- ३०५३) चावी घेत कारमधून पसार झाले. सुमारे दोन ते सव्वादोन तास दरोडेखोरांचा बोडके यांच्या बंगल्यात बिनधास्त वावर होता. डोक्यात टोप्या, अंगात जर्किन, तोंडाला रुमाल बांधलेले सहा ते सात दरोडेखोर होते, तर त्यांच्यातील एकच दरोडेखोर शुद्ध मराठीत बोलत होता. अन्य दरोडेखोर त्याच्या सूचनेप्रमाणेच वावरत असल्याचे रतन बोडके यांनी सांगितले.

क्रेटा कार ढकांबे फाट्यावर

बोडके यांची कार घेऊन पसार झालेल्या दरोडेखोरांनी कार ढकांबे फाट्यावरील वाडा ढाब्याजवळ सोडून दिल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी श्‍वानपथक आणले असता, त्यानेही वाडा ढाब्यापर्यंतच मार्ग दाखविला. तर चोरट्यांनी जाताना सीसीटीव्हीचे डीव्हीआरही सोबत नेल्याने पुरावाच ठेवला नाही. तसेच, येतानाही दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे उलटे फिरविल्याचे आढळले. बंगल्याबाहेर असलेल्या बोडके यांच्या श्‍वानालाही त्यांनी गुंगीचे औषध दिल्याने तोही शांत पडून होता.

"दरोडेखोरांकडे पिस्तूल अन्‌ हत्यारे असल्याने त्यांना विरोध केला असता, तर जिवावर बेतले असते. त्यामुळे त्यांना जे न्यायचे ते नेऊ दिले. दोन-सव्वा दोन तास ते बंगल्यात होते. आम्हा सर्वांना त्यांनी वरच्या बेडरूममध्ये डांबले होते. जातानाही ते नवीन क्रेटा कार घेऊन गेले."

- रतन बोडके, ढकांबे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT