धुळे ः टुडे १ साठी, संक्षिप्त
---
मायलेकाला मारहाण;
नऊ जणांविरुद्ध गुन्हा
धुळे : किरकोळ गैरसमजातून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना लखमापूर (ता. साक्री) येथे घडली. राहुल चिंधा बाचकर (रा. लखमापूर) व त्यांच्या आई देऊबाई चिंधा बाचकर यांना लोखंडी पाइप, फायटर, चाकू, लाकडी दांडके व काठ्यांनी मारहाण केल्याची तक्रार निजामपूर पोलिस ठाण्यात दाखल झाली. याप्रकरणी सहा जणांसह दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तक्रारीनुसार ३० सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास घरासमोर राहुल बाचकर यांनी साहेबराव सुखदेव बाचकर यांना त्यांच्या पुतण्याला समजावून सांगण्यास सांगितले. या बोलण्याचा गैरसमज झाल्यानंतर साहेबराव सुखदेव बाचकर, रोहिदास साहेबराव बाचकर, शरद साहेबराव बाचकर, भटू लहानू बाचकर, हिरामण लहानू बाचकर, भिका सुखदेव बाचकर (सर्व रा. लखमापूर, ता. साक्री) व दोन ते तीन अनोळखी व्यक्तींनी वाद घालत राहुल व त्यांच्या आईला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आईला वाचविण्यासाठी राहुल आडवे झाले असता चाकू, लोखंडी फायटर व रॉडने मारहाण केल्याने ते जखमी झाले. तसेच देऊबाई यांनाही काठ्या व दांडक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
---
साक्रीत घरफोडी;
किमती ऐवज चोरीला
धुळे : साक्री शहरातील विद्यानगर परिसरात घरफोडी करून चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने व मनगटी घड्याळ, असा एकूण ८४ हजार ८०० रुपयांचा ऐवज नेला. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सुरेश पंजाबराव देवरे (रा. विद्यानगर, साक्री) हे २९ सप्टेंबरला सायंकाळी घर बंद करून बाहेर गेले. त्यानंतर ३० सप्टेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. कपाटातील ६५ हजार रोख, १९ हजारांचे सोन्याचे दागिने, ५०० रुपयांची दोन चांदीची लक्ष्मीदेवीची नाणी आणि ३०० रुपयांचे मनगटी घड्याळ असा ऐवज लंपास केला.
---
विजेच्या धक्क्याने
तरुणाचा मृत्यू
धुळे : शेतजमिनीत झाड तोडत असताना अतिउच्च दाबाच्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने धक्का बसून तरुणाचा मृत्यू झाला. मुरजी फुलजी वसावे (रा. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हा ३० सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास शिंदखेडा येथे शेतात झाड तोडत होता. त्या वेळी टॉवरवरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला. त्याला शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
---
गोवंश वाहतूक रोखली;
चालकाविरुद्ध गुन्हा
धुळे : सोलापूर-धुळे महामार्गावरील नरव्हाळ (ता. धुळे) शिवारातील हॉटेल पाटीलवाड्यासमोर मोहाडी पोलिसांनी कारमधून होत असलेली गोवंश वाहतूक रोखली. ३० सप्टेंबरला पहाटे तीनच्या सुमारास गस्तीवर असताना पोलिसांना ही वाहतूक आढळली. कारमधील दोन गायी व कार (एमएच ०१, एएल ४६२६), असा एकूण ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कर्मचारी अयद निजाम यांच्या फिर्यादीनुसार मोहाडी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.