धुळे ः टुडे ३ साठी, मेन
---
लोगो क्रमांक ः 31221
---
गुन्हेगार हेच धुळ्यातील तरुणांचे आदर्श!
उदात्तीकरण अन् विघातक प्रवास; गोळीबारामुळे ऐरणीवर विदारक वास्तव
निखिल सूर्यवंशी ः सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या धुळे शहरात आज चिंतेचे आणि सुन्न करणारे काळे मेघ दाटून आले आहेत. ज्या वयात हातामध्ये पुस्तके, पेन आणि डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्ने असायला हवीत, त्याच उमद्या वयात आज अनेक तरुण कारागृहाच्या उच्च सुरक्षा भिंतींमागे बंदिस्त होत आहेत. शहरात वाढणारी गुन्हेगारी, गुन्हेगारांना मिळणारे अनपेक्षित ‘उदात्तीकरण’ आणि त्यातून दिशाहीन झालेली तरुण पिढी हे आजचे सर्वांत मोठे वास्तव आहे. जिथे श्रमाला खरी प्रतिष्ठा मिळायला हवी, तिथे दुर्दैवाने आता गुन्हेगारी प्रवृत्तीलाच नवी प्रतिष्ठा लाभत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. हे चित्र भविष्यात खरोखरच बदलणार की आपण एका विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपणार, याविषयी आत्मचिंतन करण्याची आणि कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
दहशतीचा बडगा
शहरात पुन्हा एकदा मुजावर टोळ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तींनी आपले डोके वर काढले आहे. घातक हत्यारे बाळगून संपूर्ण शहरात दहशत निर्माण करण्याचा विडाच जणू त्यांनी उचलला आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे २७ सप्टेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बाजारपेठेच्या आग्रा रोडवरील मनोहर टॉकीज परिसरात घडलेली गोळीबाराची थरारक घटना होय. एका सट्टापेढीच्या जागेवरून झालेल्या क्षुल्लक वादानंतर एका गटाच्या सदस्याने थेट विरोधी गटाच्या सदस्याच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. दैव बलवत्तर म्हणून ती गोळी चुकल्याने सुदैवाने प्राणहानी टळली; परंतु त्यानंतर गुन्हेगारांनी हवेत सलग तीन फैरी झाडत संपूर्ण परिसरात दहशत निर्माण केली.
तरुणांचा सहभाग
पोलिसांचा कोणताही मुलाहिजा किंवा धाक न बाळगता जणू काही संपूर्ण कायदा व सुव्यवस्था आपल्या ‘खिशात’च आहे, अशा मस्तवाल आविर्भावात हा बेडरपणे गोळीबार करण्यात आला. विशेष म्हणजे या दोन गटांच्या रक्तरंजित संघर्षात सहभागी असलेले बहुतांश तरुण हे राजकारणाशी निगडित असल्याची चर्चा शहरात लपून राहिलेली नाही. राजकीय वरदहस्तामुळेच या गुन्हेगारांचे फावत असल्याची कुजबूज दबक्या आवाजात का होईना, पण धुळेकर करत आहेत. अशा वाढत्या निरनिराळ्या गैरघटनांमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी आता तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गांभीर्याने हाती घेऊन या गुन्हेगारीवर कायमस्वरूपी कठोर तोडगा काढावा, अशी तीव्र अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
नशेखोरीचा विळखा
शहरात आज तरुणाईला कोमेजून टाकणारी नशेखोरी कर्करोगासारखी वेगाने पसरली आहे. नशेच्या आहारी गेलेली ही तरुण पिढीच नकळतपणे आणि मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकडे ओढली जात आहे. नशेत तर्रार असणाऱ्या या तरुणांमध्ये कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी कृत्य करण्याचे धाडस वाढीस लागल्याचे दिसत आहे. परिणामी, पोलिसांना आता केवळ वरवरची कारवाई करून चालणार नाही, तर पाळेमुळे खणून काढत नशेखोरी आणि सर्व अवैध व्यवसाय तातडीने व कठोरपणे बंद करावे लागतील.
कायद्याचा धाक नाही
गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळणारे राजकीय व सामाजिक प्रोत्साहन वेळीच थांबवले पाहिजे. अवैध व्यवसाय, नशेखोरी आणि गुन्हेगारीला मिळणारे संरक्षण तसेच समाजाची असलेली संशयास्पद डोळेझाक या सर्व बाबींवर वेगवेगळ्या स्तरांवर ठोसपणे काम करण्याची वेळ आली आहे. आजची सर्वांत मोठी शोकांतिका म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा किंवा कायद्याचा तिळमात्रही धाक उरलेला नाही. एखादा मोठा गुन्हा केल्यानंतर पोलिस त्यांना अटक करतात, काही दिवसांतच जामीन मिळून ते बाहेर येतात आणि पुन्हा पूर्वीप्रमाणेच गुन्हेगारी कारवाया सुरू करतात. या गुन्हेगारांवर कायद्याचा असा धाकच राहिला नसल्यामुळे ‘गुन्हा केल्यानंतर आपले काहीच वाकडे होत नाही,’ अशी त्यांची पक्की धारणा झाली आहे. या सर्व दुष्टचक्राचा शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासावर अत्यंत विपरीत परिणाम होत आहे.
---
१४-१
चौकट
‘बदनाम’ होत असलेले धुळे...
सततच्या गुन्हेगारीमुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या धुळ्याचा लौकिक मलिन होऊन कलंकित होत आहे. वास्तविक पाहता कोणत्याही सुसंस्कृत समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा मिळता कामा नये; परंतु दुर्दैवाने इथे तसे ठोसपणे होताना दिसत नाही. आजही हे गुन्हेगार नवनवीन माध्यमांचा आणि सोशल मीडियाचा वापर करून शहरात आपली दहशत माजविण्याचा विघातक प्रयत्न करत आहेत. सर्वांत मोठा प्रश्न हा पडतो, की या गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती सोडून एवढे अमाप धाडस येते कुठून? तरुणाईला अंधाराकडून उजेडाकडे म्हणजेच विधायकतेकडे घेऊन जाण्याची आणि त्यांना योग्य दिशा दाखवण्याची खरी जबाबदारी समाजातील धुरिणांची, ज्येष्ठांची आणि पालकांची आहे. केवळ पोलिसांवर सर्व मदार सोडून चालणार नाही, तर गुन्हेगारीच्या या विळख्यातून आपल्या लेकरांना आणि शहराला बाहेर काढण्यासाठी विविध स्तरांतून लोकचळवळ उभी राहण्याची नितांत आवश्यकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.