धुळे ः टुडे ३ साठी, संक्षीप्त
--
अनुदानाचे आमिष;
तिघांविरुद्ध गुन्हा
धुळे : बचत गटातील महिलांना शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून एक लाख २० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अजनाळे (ता. धुळे) येथील योगीता दिनेश चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार गावातील मनीष अण्णा भोसले, अनुसयाबाई मनीष भोसले (दोघे रा. अजनाळे) आणि विनोद कांतीलाल पवार (रा. हेंकळवाडी, ता. धुळे) यांनी बचत गटातील महिलांना शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले. अनुदानाची ६९ हजार ९९८ रुपयांची रक्कम शासनाला परत करावी लागेल आणि शासकीय कामासाठी खर्च येईल, असे सांगून महिलांकडून पैसे घेतले. फिर्यादी चव्हाण व त्यांच्या सासूकडून ४० हजारांसह एकूण एक लाख २० हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
-
शेतातून चोरलेल्या
सात मोटारी हस्तगत
धुळे : वरखेडी, आर्णी व कुंडाणे (ता. धुळे) शिवारातून चोरीस गेलेल्या पाण्याच्या सात इलेक्ट्रिक मोटारी धुळे तालुका पोलिसांनी हस्तगत केल्या. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तीन मोटारी संबंधित शेतकऱ्यांना परत केल्या. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर जाधव यांच्या मार्गदर्शनात धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवीकुमार पवार, रवींद्र माळी, संजय जाधव, संदीप पाटील, सुधीर शिरसाट यांनी ही कारवाई केली.
-
खबरीचा संशय;
तरुणावर हल्ला
धुळे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून कुऱ्हाड व दगडांनी मारहाण करून तरुणाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आदिल ऊर्फ नदीम रज्जाक शेख ऊर्फ नदीम काल्या (रा. जनता सोसायटी, वडजाई रोड, धुळे) हा २१ ऑक्टोबरला पहाटे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जखमी अवस्थेत आढळला. रुग्णालयात पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला. गुरांची वाहतूक केल्याची माहिती तो पोलिसांना देत असल्याच्या संशयावरून हल्ला केल्याचे त्याने जबाबात सांगितले. या मारहाणीत त्याच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली. त्यावरून संशयित जाकीर शेंड्या, त्याचा भाऊ भुऱ्या, अबरार आणि त्याचा भाऊ (पूर्ण नावे उपलब्ध नाहीत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-
दुचाकी घसरून
महिलेचा मृत्यू
धुळे : सातारपाडा (ता. साक्री) गावाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात रेखाबाई भालचंद्र पवार (वय ४०, रा. जामखेल, ता. साक्री) यांचा मृत्यू झाला. ही घटना सहा ऑक्टोबरला सकाळी दहाच्या सुमारास घडली. भालचंद्र जानू पवार हे पत्नी रेखाबाई यांच्यासह मित्र विलास बागूल यांच्या मालकीच्या दुचाकीने (एमएच १८ बीयू ८४७२) धुळ्याकडे जात होते. सातारपाडा गावाजवळ फुलबाई वडाच्या झाडाजवळ दुचाकी घसरल्याने दोघेही रस्त्यावर पडले. यात भालचंद्र पवार यांना किरकोळ दुखापत झाली, तर रेखाबाई यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना उपचारासाठी हिरे रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
बिअर शॉपसमोरून
दुचाकी लांबविली
धुळे : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) शहरातील नंदुरबार चौफुली परिसरातील बिअर शॉपसमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेली. प्रदीप सत्तरसिंग राजपूत (रा. रामी, ह. मु. दोंडाईचा, ता. शिंदखेडा) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १८ एएम २६४२) २२ ऑक्टोबरच्या रात्री चोरट्याने नेली. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.