धुळे ः टुडे १ साठी, मेन
--
धुळ्यात अवैध व्यवसायांविरोधात महापौर मैदानात
आरोपांमुळे व्यथित कारवाईसाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : शहरासह जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, गोवंश तस्करी, बेकायदा कत्तलखाने, गुटखा व बनावट मद्यविक्रीचे रॅकेट तसेच सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी ठाम मागणी महापौर मायादेवी परदेशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी (ता. १६) चर्चा करत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना सविस्तर निवेदन सादर केले असून, पुढील चार दिवसांत केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संयुक्त चर्चेवेळी अवैध व्यवसायांवर ठोस कारवाईतून धुळे स्वच्छ करा आणि व्यसनमुक्ती, नशामुक्तीसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केल्याचे महापौर परदेशी यांनी सांगितले.
धुळे शहर व जिल्ह्यात थंडीची जाणीव होऊ लागली असली तरी दुसरीकडे गेल्या पंधरवड्यापासून सोशलमीडियाच्या माध्यमातून स्थानिक भाजप विरुद्ध गोरक्षक, असा शाब्दिक भडका उडाला आहे. आमदार अनुप अग्रवाल आणि महापौरपुत्र विकी परदेशी विरुद्ध गोरक्षक संजय शर्मा, असे चित्र समोर येत असतानाच महापौर परदेशी आणि त्यांचे पती तथा धुळे बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी यांनाही लक्ष्य करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या राजकीय संघर्षामुळे धुळ्याचे सामाजिक व राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, या शाब्दिक युद्धात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे आणि उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनीही उडी घेतल्याने वातावरण अधिकच तप्त झाले आहे.
या राजकीय संघर्षात आरोप-प्रत्यारोपांनी कळस गाठला असून, विविध प्रकारचे अवैध व्यवसाय आणि कत्तलखाने या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्यामुळे धुळ्याच्या राजकारणातील पारा चढला आहे. या वाढत्या शाब्दिक युद्धामुळे आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे धुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
-
चार प्रमुख मागण्या
महापौर परदेशी यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे निवेदनाद्वारे चार मागण्या केल्या.
- धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व गोसेवकांनी पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करत सुमारे १०० ते १५० गोवंशांची कत्तलीपासून सुटका केली होती. मात्र या गंभीर प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नसल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून या तस्करीमागील आर्थिक व्यवहार, वाहतूक स्रोत आणि सूत्रधारांचा शोध घ्यावा. संघटित टोळीचा सहभाग आढळल्यास दोषींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी.
- अवैध कत्तलखाने : धुळे शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमुळे कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. महापालिका, पोलिस प्रशासन व संबंधित विभागांनी संयुक्त तपासणी करून हे कत्तलखाने तात्काळ बंद करावेत. नियमानुसार ते सील करून तेथे पुन्हा गैरप्रकार होऊ नयेत यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करावा.
-
रॅकेटचा पर्दाफाश करा
गुटखा आणि बनावट मद्य तस्करी : धुळे तालुका पोलिस ठाणे व पिंपळनेर परिसरात नुकत्याच झालेल्या कारवाईत प्रत्येकी सुमारे १०० पोती प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईची माहिती सार्वजनिक करून जप्त मालाचा पुरवठादार, मालक आणि बनावट मद्यविक्री रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विचारात घ्यावा.
आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण : गोरक्षक संजय शर्मा यांनी शहराचे आमदार व महापौरांविरोधात केलेल्या कथित वक्तव्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. उपलब्ध ध्वनिचित्रफिती, ध्वनिमुद्रिका व सोशलमीडिया पोस्टची तपासणी करून त्यामध्ये जातीय अवमान, धमकी किंवा दोन समाजगटात वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न आढळल्यास अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करावा.
-
35176
शहरात कोणत्याही प्रकारच्या अवैध व्यवसायाला, गोवंश तस्करीला किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना थारा मिळू नये. कायदा सर्वांसाठी समान असून दोषी कोणत्याही पदाचा, पक्षाचा किंवा समाजाचा असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. प्रशासनाने संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन चार दिवसांत कारवाईचा लेखी तपशील द्यावा. कथीत गोरक्षकाकडून सोशलमीडियाव्दारे आमच्यावर होणारे बिनबुडाचे, तथ्यहीन बदनामीकारक आहे.महापौरपदाचा राजीनामा देईल, पण चुकीचे, निराधार आरोप सहन करणार नाही.
- मायादेवी परदेशी, महापौर, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.