धुळे ः टुडे १ साठी, मेन
---
अवैध व्यवसायांच्या आरोपांवरून महापौरांचे उपोषणास्त्र
सत्तेच्या बालेकिल्ल्यातच भाजपची कोंडी, तर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांपुढे पेच
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ ः थंडीची चाहूल लागलेल्या धुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण सध्या मात्र चांगलेच तापले आहे. गोवंश तस्करी, अवैध कत्तलखाने, प्रतिबंधित गुटखा आणि बनावट मद्यविक्री यांसारख्या अवैध व्यवसायांच्या आरोप- प्रत्यारोपांवरून गेल्या पंधरवड्यापासून सोशल मीडियावर तीव्र शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी सत्ताधारी भाजपचे नेते आणि गोरक्षक आल्याने वर्तुळात खळबळ उडाली आहे. यात विविध आरोपांवरून बदनामीला सामोरे जावे लागत असलेल्या भाजपच्या येथील महापौर मायादेवी परदेशी यांनी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि चार दिवसांत याबाबतचा लेखी अहवाल द्यावा, अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात नवा पेच निर्माण झाला असून, सत्तेच्या बालेकिल्ल्यातच भाजपची ''कोंडी'', तर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची ‘गोची‘ झाल्याचे चित्र अधोरेखीत होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार अनुप अग्रवाल आणि महापौरपुत्र विकी परदेशी विरुद्ध गोरक्षक संजय शर्मा यांच्यात सोशल मीडियावर तीव्र शाब्दिक युद्ध सुरू आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील गोवंश सुटका प्रकरण, शहरातील अवैध कत्तलखाने, तसेच धुळे तालुका व पिंपळनेर परिसरातील गुटखा आणि बनावट मद्यविक्रीच्या रॅकेटवरून दोन्ही बाजूंकडून गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या वादात महापौर मायादेवी परदेशी आणि त्यांचे पती तथा बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी यांनाही लक्ष्य केले जात असल्याने त्यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपची राजकीय कोंडी
जिल्ह्याच्या राजकारणावर सध्या भारतीय जनता पक्षाची मजबूत पकड आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिरपूर आणि शिंदखेडा या चारही विधानसभा मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत. शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे, तर राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. राज्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सर्वत्र भाजपचीच सत्ता असताना, त्याच पक्षाच्या महिला महापौरांनी अवैध व्यवसायांविरोधात आणि स्वतःवरील बेछूट आरोपांच्या निषेधार्थ उपोषणाचा पवित्रा घेतल्याने स्थानिक भाजप नेत्यांसह जिल्हा व पोलिस प्रशासनाची मोठी गोची झाली आहे.
नागरिकांत चिंतेचे सावट
सत्ताधारी गटातील अंतर्गत धुसफूस, विरोधकांचे टीकास्त्र आणि सोशल मीडियावरील ‘त्या‘ विषयांकीत वाढत्या शाब्दिक हल्ल्यांमुळे धुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा पार्श्वभूमीवर सामान्य धुळेकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या चार दिवसांत प्रशासन नेमकी काय पावले उचलते आणि पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर या वादावर काय व कसा पडदा पडतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
---
१४-१
फोटो क्रमांक ः 35230....मायादेवी परदेशी
१४-१
महापौर परदेशी यांची ठाम भूमिका
महापौर मायादेवी परदेशी यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना सोमवारी (ता. १६) निवेदन सादर केले. गोवंश तस्करी, अवैध कत्तलखाने, गुटखा रॅकेट आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांविरोधात कठोर पावले उचलून चार दिवसांत लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यात महापौरांनी उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणात पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या मुंबईत असलेले पालकमंत्री चार दिवसांनी धुळ्यात परतल्यावर महापौरांची समजूत काढतील, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, ‘सकाळ’शी बोलताना महापौर परदेशी यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. ‘कथित गोरक्षक आणि काही विरोधकांकडून समाजमाध्यमांवर केले जाणारे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत. कायदा सर्वांसाठी समान असून, दोषी कोणत्याही पदाचा किंवा पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. प्रसंगी महापौरपदाचा राजीनामा देईन, पण निराधार आरोप सहन करणार नाही. जोपर्यंत पोलिस दोषींना अटक करत नाहीत, माझ्यासह कुटुंबावरील आरोप खोटे सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत कोणाचेही ऐकणार नाही आणि उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहीन,’ असेही महापौरांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.