रविवार विशेष : एक शून्य शून्य
....
प्रकाश पाटील (सहायक पोलिस निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे)
फोटो H31881
.....
टीकटॉक स्टार पत्नी अन् प्रियकराने मास्तरचा केला घात
...
धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या रस्ता अपघातात जिल्हा परिषद शिक्षक ठार झाले होते. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी अन् घटनास्थळाच्या पंचनाम्यावरून समोर आले होते. मात्र सोनगीर पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी सहायक पोलिस निरीक्षकांना चणे-फुटाणे विक्रेत्याने दिलेल्या माहितीमुळे खुनाचे गूढ उकलले.
- नरेश हाळणोर
सन २०२१ मध्ये धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील हे कर्तव्य बजावत होते. सोनगीर हद्दीत मध्यरात्रीच्या वेळी अपघाताची घटना घडली होती. खबर मिळताच, स्वत: प्रकाश पाटील हे पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत जिल्हा परिषदेचे शिक्षक रमेश पाटील यांचा मृत्यू झाला होता. घटनेची खबर मिळताच, मयत पाटील यांची पत्नी आणि नातलगही घटनास्थळी दाखल झाले. त्याप्रमाणे, सोनगीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्या वेळी मयत पाटील यांची पत्नी आणि नातलगांनी मयत पाटील यांच्या अपघाती विम्याची रक्कम विनासहाय मिळावा यासाठी मदत करण्याबाबत सहायक निरीक्षक पाटील यांना विनंती केली. त्या वेळी पाटील यांनी कायद्यानुसार जी काही मदत असेल ती केली जाईल असे स्पष्ट केले.
मयत पाटील यांच्या अपघाती विम्याची रक्कम मिळावी, यासाठी पत्नीसह नातलगांनी सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्यावर दबाव आणणे सुरू केले. त्यासाठी त्यांनी अज्ञात वाहनांची नोंद करावी, असे त्यांचे म्हणणे होते. तर, प्राथमिक तपासातून इनोव्हा कारच्या धडकेत पाटील ठार झाले होते. परंतु तसे करण्यास सहायक निरीक्षक पाटील यांनी नकार दिला. त्यामुळे मयत पाटीलच्या पत्नीने वकिलाला पोलिस ठाण्यात बोलावले. त्यांनीही तसेच सांगितले. तर, सहायक निरीक्षक पाटील यांनी स्पष्ट नकार देत त्याप्रमाणेच गुन्हा नोंद केला. मात्र मयत पाटीलच्या पत्नीने एफआयआरवर स्वाक्षरी करण्यास नकार देत आडमुठेपणाची भूमिका घेतली. अखेर सहायक निरीक्षक पाटील यांनी वकिलासह नातलगांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली असता, त्यांनी एफआयआरवर स्वाक्षरी केली.
अपघात असल्याने त्याचा तपास हवालदाराकडे देण्यात आला होता. ज्या फाट्यावर अपघात झाला होता, त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज नव्हते. परंतु, एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारने धडक दिली, अशी माहिती तपासातून समोर आली होती. एका कामानिमित्ताने सहायक निरीक्षक प्रकाश पाटील हे नरडाणा ब्रीजखाली गेले होते. त्या वेळी त्या ठिकाणी एक चणे-फुटाणे विक्रेत्याशी बोलत असताना, पाटील मास्तराच्या अपघाताचा विषय निघाला. त्या वेळी त्या विक्रेत्याने त्यांना महत्त्वाची माहिती दिली. अपघात झाला त्याच रात्री पाटील मास्तर आणि आणखी दोघे जण हे नरडाणा ब्रीजजवळ असलेल्या बिअरबारमध्ये बसले होते आणि ते पांढऱ्या रंगाच्याच कारमधून तेथून गेल्याचीही माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक प्रकाश पाटील यांनी बिअरबारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासकामी ताब्यात घेतले. त्यात पाटील मास्तर याच्यासह आणखी दोघे जण त्या बिअरबारमध्ये बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ते बाहेर आल्यानंतर यातील दोघेजण हे पांढऱ्या रंगाच्याच इनोव्हा कारमध्ये बसून निघाल्याचे दिसल्याने पाटील यांचा संशय बळावला. सीसीटीव्ही फुटेजमधील दोघांचा शोध सुरू केला असता, त्यातील एक सोनगीरनजिक असलेल्या एका गावाचा सरपंच शरद राठोड तर, दुसरा कारचालक दादा भोई होता. हे दोघेही पाटील मास्तरच्या अंत्यविधीला हजर नव्हते. यामुळे सहायक निरीक्षक पाटील यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
सहायक निरीक्षक पाटील यांनी दादा भोई याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. पाटील मास्तर यांच्या अपघाताबाबत चौकशी सुरू केली असता, त्याची प्रकृतीत अचानक बिघडली. दादा भोई शरीराने काहीसा लठ्ठ असल्याने त्याने हृदयविकाराचा त्रास होत असल्याचे भासविले. सहायक निरीक्षक पाटील यांनीही सावधगिरीची भूमिका घेत त्याला १०८ रुग्णवाहिकेतून धुळ्याच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दादा भोईची तपासणी सुरू केली असता, तो भितीपोटी अधिकच त्रास होत असल्याचे नाटक करू लागला. ही बाब डॉक्टरांसह सहायक निरीक्षक पाटील यांच्या लक्षात आली होती. चार-पाच तास झाल्यानंतर सहायक निरीक्षक पाटील हे दादा भोईजवळ गेले. प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर, थेट मुद्याला हात घातला आणि अपघात तू केला नाही हे मला माहिती आहे, पण तू नेमके काय झाले ते सांग. तसे नाही केले तर मात्र आम्ही तूच पाटील मास्तरला दारू पाजली आणि त्याचा कारच्या धडकेत खून केल्याच्या गुन्ह्यात अटक केली जाईल, असे सांगितले. हे ऐकून दादा भोईला त्याचे पितळ उघडे पडल्याचे लक्षात आले. त्यांनी काही क्षण विचार केल्यानंतर सहायक निरीक्षक पाटील यांना सगळेच सांगून टाकले.
पाटील मास्तरची पत्नी ही टीकटॉक स्टार होती. रिल्स बनवून ती सोशल मीडियावर अपलोड करायची. सोनगीर परिसरामध्ये ती चांगलीच प्रसिद्ध होती. यातूनच तिचे नजीकच्या गावचा सरपंच शरद राठोड याच्याशी सूत जमले होते. जवळीक वाढून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यामुळे पाटील मास्तरला ती हीन वागणूक देत होती. राठोडही चारचौघांमध्ये पाटील मास्तर याचा पाणउतारा करायचा. यातून त्याची पत्नी अन् राठोड यांनी पाटील मास्तरचा काटा काढायचा ठरवले अन् त्यांनी कटकारस्थान रचले. दादा भोई अन् शरद राठोड हे पाटील मास्तरला पार्टी करण्यासाठी नरडाणा ब्रीजजवळील बिअरबारमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांनी पाटील मास्तरला भरपूर दारू पाजली. त्यानंतर राठोडच्या इनोव्हा कारमधून दादा भोई मास्तरला घरी सोडण्यासाठी निघाला. तर राठोड दुचाकीवरून इनोव्हाच्या पाठीमागे आला. कट रचल्याप्रमाणे, काही अंतर कार गेल्यानंतर दादा भोईने कार थांबविली. राठोडही दुचाकीवरून आला. राठोडने पाटील मास्तरला दुचाकीवरून घरी सोडतो म्हणून त्यांना दुचाकीवर बसविले. गावाच्या फाट्याजवळ आल्यानंतर मद्याच्या नशेत असलेल्या पाटील मास्तरला राठोडने दुचाकीवरून उतरविले आणि घर जवळच आहे, पायी जाऊ शकता असे सांगितले. पाटीलही दुचाकीवरून उतरले आणि घराच्या दिशेने चालू लागले. त्याचवेळी शिजलेल्या कटाप्रमाणे, दादा भोई याने इनोव्हा कारने पाटील मास्तरला जोरदार धडक दिली अन् पसार झाला. कट रचल्याप्रमाणे, पाटील मास्तरच्या पत्नीने अपघातच झाल्याचे सांगितले. त्याप्रमाणे नातलगांनीही तेच मानले. घटनास्थळीही अपघातच झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु सहायक निरीक्षक प्रकाश पाटील यांनी अपघाताच्या गुन्ह्याची उकल करताना पाटील मास्तरचा खून केल्याचे शोधून काढले. या प्रकरणी सरपंच शरद राठोड, दादा भोईसह मयत पाटील यांच्या पत्नीला बेड्या ठोकल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.