जिल्हा मुख्यालयातून...
विकासकामे कागदापुरती मर्यादित न ठरो!
---------------------------------
जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून नगरपालिका तसेच ग्रामीण क्षेत्राला समप्रमाणात निधी देऊन प्रशासनाने सुवर्ण मध्य साधला खरा. परंतु यंत्रणांमधील उदासीनता लक्षात घेता विविध विकासकामे कागदापुरती मर्यादित ठरली आहेत. त्यामुळे तुर्तास मंजुरी प्राप्त कामांचा या यादीत समावेश न होवो, एवढीच जिल्हावासीयांची अपेक्षा आहे.
- गौरव जोशी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वास थाटामाटात प्रारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याच्या आयोजनाबाबत जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. पण, या एका दिवसाच्या सोहळ्यानंतर सध्या नाशिक-त्र्यंबकवासीयांची अवस्था ‘येरे माझ्या मागल्या’ याप्रमाणे झाली आहे. ध्वजारोहण सोहळ्यानंतर सिंहस्थाशी संबंधित विकासकामे पुन्हा थंडावली आहेत. परिणामी जनतेला त्याचा नाहक मनस्ताप त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही नाशिककरांना खड्डे, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील धुळीचे लोळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पण, शासकीय यंत्रणांना याबाबत कोणतेच सोयरसूतक दिसून येत नाही.
तब्बल दीड वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या रूपाने जिल्ह्याला पालकत्व लाभले. त्यामुळे जिल्ह्याची बिघडलेली विकासाची घडी पूर्वपदावर येईल, अशी जनतेला अपेक्षा होती. मात्र, तेथेही केवळ कोट्यवधींच्या विकासकामांच्या घोषणाच होताना दिसून येत आहेत. वास्तविक गेल्या दीड वर्षात पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याच्या लौकिकात भर पाडेल, असा एकही प्रकल्प किंवा विकासकाम उभे राहिले नाही. त्यामुळे मंत्री महाजन यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर किमान जिल्हा नियोजन विकासच्या निधीतून एखादा चांगला प्रकल्प उभा राहिल, अशी अपेक्षा सामान्यांना लागून आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात भगूर, चांदवडसह इतर काही तालुक्यातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची घोषणा केली. त्यामध्ये ग्रीन जीम, इलेक्ट्रिकल वाहनांचे चार्जिंग स्टेशन, महिला आणि युवकांसाठीच्या विविध उपक्रमांसह कौशल्य विकास तसेच प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे. कागदावर ही कामे अधिक चांगली वाटत असली तरी प्रत्यक्ष निधी उपलब्धतेपासून ते इतर सर्व तांत्रिक बाबी तसेच सध्याच्या अडीअडचणी लक्षात घेता ही कामे वेळेत पूर्ण होण्याबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
यंदाचा दुष्काळ पाहता या संकटाच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांना घाम गाळावा लागणार आहे. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने कोट्यवधींच्या कामांना हिरवा कंदील दिला असला तरी सध्याची दुष्काळी स्थिती आणि यंत्रणांमधील उदासीनता लक्षात घेता संबंधित कामे वेळेत पूर्णत्वास जाण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आजवरचा जनतेचा अनुभव लक्षात घेता विकासकामांच्या घोषणा भरपूर होतात. त्याप्रमाणे यंत्रणांच्या पातळीवर लगबगही दिसून येते. मात्र, ही कामे वेळेत पूर्णत्वास जात नसल्याने त्याचा नाहक त्रास सामान्यांना सहन करावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर तुर्तास मान्यताप्राप्त विकासकामे तरी कागदापुरती मर्यादित न ठरो, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.