फोटो -NSK26H34612
बलिप्रतिपदा, भाऊबीज...संस्कार आदराचे
------------------------------------
दिवाळी एक संस्कारांचा मेळ आहे. आज केवळ भारतात नव्हे; तर विश्वातील असंख्य ठिकाणी दिवाळी साजरी केली जात आहे आणि हे भारतीय संस्कार शरीर व मनाच्या आरोग्यासाठी पसरत आहेत ही गर्वाची बाब आहे..अशीच दिवाळी वर्षभर सर्व घरात, विश्वात यावी आणि हे शास्त्र अबाधित राहो.
- वैद्य विक्रांत जाधव
दिवाळी पाडवा .. कार्तिक महिन्याचा प्रथम दिन. विवाहित दांपत्यामध्ये ‘स्त्री पुरुषाला ओवाळते, हा संस्कार आशीर्वादासाठी आणि उज्वल संसारासाठी...या दिवसाला वेगळे महत्त्व आहे, ते बळी प्रतिपदेचे. यासंदर्भात पौराणिक कथा आहे, ती भगवान विष्णूची. विष्णू भगवानाने वामन अवतारात बळीला पाताळात ढकलून दिले. परंतु बळीच्या आजोबांच्या इच्छेनुसार त्याला वरदान दिले की, बळी पाताळातील राजा असेल आणि लोक त्याची पूजा करतील म्हणून बळी प्रतिपदा. ह्या कथेला एक मानसिक चिकित्सेचे रूप आहे. पाडव्यालादेखील एक रूप असून संसारात राहणाऱ्या दोघा परिवाराची वृद्धी आणि संसाराची वृद्धी! प्रेम आणि सुविचार यांचा मेळ या ठिकाणी शास्त्राने केला असून आज त्याची आवश्यकता अधिक आवश्यक वाटते.
पाडवा हा दिवाळीचा पण स्त्रीने ओवाळणे आणि पत्नी प्रती प्रेम, आदरनिष्ठा ह्याची प्रचिती देणे हा एक मानसिक संतुलन, सुविचारी करण्याचा प्रयत्न ह्यातून शस्त्राने केला आहे. आज मनाचा खेळ वेगळा झाला असून अनेक समज- गैरसमज एकमेकांमध्ये होण्याने आयुष्यात मनाच्या व्याधी निर्मिती होताना दिसते. पुराणकालीन हे संस्कार, ह्या प्रथा जर पाळल्यास हे अनर्थ टळण्यास मदत होते आणि हाच विचार शास्त्राचा असावा. एकमेकांना भेटवस्तू देऊन संबंध दृढ करण्याचे संस्कार म्हणजे पाडव्याची ओवाळणी आणि त्या निमित्त आदरभाव वाढवणे. पाडव्याच्या कथेमध्ये भगवान विष्णूला लक्ष्मी देवतेने विष्णूच्या गुणांचे कौतुक करण्यासाठी केलेली पूजा आणि विष्णूने आदर व्यक्त करत केलेली स्तुती ही ह्यातील गर्भ सांगते. दिवाळी हा केवळ शरीर आरोग्य नव्हे; तर मनाचे आरोग्य टिकविणारा सण आहे, हे ह्यातून लक्षात येते. बळीला दिलेला सन्मान आणि स्त्री पुरुषाचा एकमेकांच्या प्रती आदर ही पुढील काळ ओळखून केलेली योजना आहे. या मध्ये गोड पदार्थ खायला घालून आरोग्य स्थापनेचे ब्रीद नमूद केलेले दिसते.
भाऊबीज..दिवाळी पंचम दिन...भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया. या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात. असे केल्यामुळे त्या वर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की, यम मृत्यू पावला त्या वेळी यमीला एवढे दुःख झाले की, ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले. तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ''ओवाळणी'' देऊन बहिणीचा सत्कार करतो. या ठिकाणी ह्या ऋतूतील चांद्रप्रकाशाचे महत्त्व आरोग्यदृष्ट्या सांगितले आहे. कोजागरीला चंद्रासमोर दूध ठेवून नंतर सेवन करणे हा संस्कार सांगून चंद्राचा आरोग्याशी संबंध जोडला आहे.
या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून ह्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते. त्याला प्रेमाचा टिळा लावते, तो टिळा बहिणीच्या निःस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा या मागचा उद्देश असतो.. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण सेवन करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. याचे सूत्र मात्र वेगळे आहे, ते बहिणीला मान देण्याचे, येथेही घर सांभाळण्यासाठी मन चिकित्सा शास्त्राने केलेली दिसायची. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे. आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांचे विशालपण यावरून दिसून येते. ‘टिळा लावणे’ हे आरोग्यासाठी आहे हे ध्यानात घ्यावे. कपाळावर ज्या ठिकाणी गंध लावले जाते ते संस्कार व्हावे, विचारांना चालना मिळून सद्बुद्धी, सत्कार्य घडावे यासाठी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.