टुडे पान ३, मेन फिचर
NSK26H34702
जळगावः दिवाळीनिमित्त वाहनाची नोंदणी करताना.
------------
NSK26H34703
वाहनाची खरेदी करताना.
-----------
दिवाळी मुहूर्तावर साडेचारशेवर वाहने येणार रस्त्यावर
जळगावात खरेदीसाठी ‘वेटिंग’; इलेक्ट्रिक वाहनांचा २० ते २२ टक्के वाटा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : दिवाळी म्हणजे नव्या वस्तूंची खरेदी आणि मुहूर्तावर वाहन घरी आणण्याची परंपरा. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने जळगावच्या वाहन बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक पेट्रोल दुचाकींसोबतच इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी दुचाकी खरेदीत अवघ्या पाच ते आठ टक्क्यांपर्यंत असलेला ईव्हीचा वाटा यंदा २० ते २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात तब्बल ४५० च्या वर नवीन वाहने रस्त्यावर येणार आहेत.
जीएसटी कपातीमुळे गतवर्षी ऑटोमोबाइल क्षेत्राला मोठी चालना मिळाली होती. यंदा दुष्काळाचे सावट आणि आर्थिक परिस्थितीतील अनिश्चितता असतानाही जळगावकरांचा वाहन खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शहरात सुमारे १२० कार आणि ६०० दुचाकींची विक्री झाल्याचा अंदाज वितरकांनी व्यक्त केला आहे. दिवाळीच्या उर्वरित दिवसांतही वाहन खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शहरात दुचाकी २०० तर चारचाकी २५० वाहने विक्री होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह कायम असला तरी कंपन्यांकडून होणारा अपुरा पुरवठा वितरकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरात तब्बल ३३० ग्राहक वाहनाच्या प्रतीक्षा यादीत आहेत.
ईव्ही दुचाकींना प्रतीक्षा
इंधनाच्या वाढत्या खर्चाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक दुचाकींकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. विशेषतः तरुणाई आणि जेनझी पिढीमध्ये ईव्हीची क्रेझ वाढताना दिसत आहे. घरांमध्ये सोलर यंत्रणा बसविण्याचे प्रमाण वाढल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगचा खर्च कमी करण्याची संधीही ग्राहकांना मिळत आहे. त्यामुळे ईव्ही दुचाकींच्या खरेदीला चालना मिळत आहे.
गेल्या वर्षी दुचाकी बाजारपेठेत ईव्हीचा वाटा पाच ते आठ टक्क्यांपर्यंत होता. यंदा तो २० ते २२ टक्क्यांवर पोहोचल्याचे वितरकांकडून सांगण्यात आले. पेट्रोलच्या वाढत्या खर्चाचा विचार करून अनेक ग्राहक आता वाहन खरेदीपूर्वी इलेक्ट्रिक आणि पेट्रोल दुचाकींची तुलना करत आहेत.
नोंदणीत ३० टक्के वाढ
इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढत असतानाच पारंपरिक बुलेटची क्रेझदेखील कायम असल्याचे चित्र आहे. यंदा बुलेटच्या बुकिंगमध्ये सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कार बाजारपेठेत यंदा दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या एसयूव्ही वाहनांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. एकूण मागणीपैकी सुमारे ६५ ते ७० टक्के मागणी दहा लाखांवरील कारसाठी आहे. तर दहा लाख रुपयांखालील कारचा वाटा ३० ते ३५ टक्के आहे.
पुरवठ्याचे आव्हान
गतवर्षी दिवाळीच्या काळात शहरात सुमारे ६०० कारची विक्री झाली होती. यंदा मात्र कारच्या मागणीत गतवर्षाच्या तुलनेत सुमारे २० टक्के घट असल्याचे वितरकांचे निरीक्षण आहे. तरीही धनत्रयोदशीच्या दिवशी शहरातील प्रमुख वितरकांनी सुमारे १२० कार ग्राहकांच्या स्वाधीन केल्या.
चौकट
भाऊबीजेपर्यंत चार हजार दुचाकी विक्रीचा अंदाज
धनत्रयोदशीच्या दिवशी सुमारे ६०० दुचाकींची विक्री झाल्याचा अंदाज आहे. यंदा दिवाळीअखेर दुचाकी विक्रीचा आकडा चार हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वितरकांनी व्यक्त केली आहे. गतवर्षी हा आकडा पाच हजारांच्या घरात होता. यंदा मागणीत काही प्रमाणात घट असली तरी सणासुदीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.