मेन
फोटो : A15157
नाशिक : तयार फराळाचे पदार्थ खरेदी करताना महिला
तयार फराळाला मागणी, पण महागाईमुळे खरेदीला कात्री
दरांत ४० टक्क्यांनी वाढ; पारंपरिक पद्धतीला काहीसा ब्रेक
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. ५ : दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठेत तयार फराळाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. धावपळीचे जीवन, वेळेचा अभाव आणि वाढती महागाई यामुळे घरोघरी फराळ तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीला काहीसा ब्रेक लागला असून नागरिकांचा कल तयार फराळ खरेदीकडे वाढताना दिसत आहे. मात्र, कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे तयार फराळही महागल्याने ग्राहकांच्या खरेदीवर मर्यादा आल्या आहेत.
पूर्वी दिवाळीच्या अनेक दिवस आधीपासून घराघरांत चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे आदी फराळाचे पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू होत असे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन फराळ बनविण्याची एक परंपरा होती. मात्र, बदलती जीवनशैली, नोकरी-व्यवसायाची धावपळ आणि वेळेची कमतरता यामुळे अनेकांना घरी फराळ तयार करणे शक्य होत नाही. त्यामुळे गृहिणींसह नागरिकांची पावले आता तयार फराळाच्या दुकानांकडे वळू लागली आहेत. दुसरीकडे, फराळ तयार करण्यासाठी लागणारे तेल, तूप, बेसन (डाळीचे पीठ), डाळी, साखर यांसह विविध कच्च्या मालाच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादकांच्या खर्चावर झाला असून, तयार फराळाच्या पदार्थांच्या किमतीत यंदा सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी, ग्राहकांची मागणी असली तरी प्रत्यक्ष खरेदीचे प्रमाण घटले आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांचे दिवाळीचे बजेट कोलमडले असून नागरिक केवळ गरजेपुरताच फराळ खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. सध्या बाजारात चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, शेव, बाकरवडी आणि करंजी या पदार्थांना सर्वाधिक मागणी दिसून येत आहे.
--चौकट
आवड कायम
महागाईमुळे तयार फराळ खरेदीच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. पूर्वी प्रत्येक पदार्थ एक ते दोन किलो खरेदी करणारे ग्राहक आता अर्धा ते एक किलोवर आले आहेत. जवळपास सर्वच पदार्थांच्या खरेदीत हीच परिस्थिती दिसून येत असून, फराळ खरेदीचे एकूण प्रमाण सुमारे ६० टक्क्यांनी घटल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. थोडक्यात, दिवाळीचा गोडवा कायम ठेवण्याची इच्छा असली, तरी वाढत्या किमतींमुळे ग्राहकांना नाइलाजाने खरेदीला कात्री लावावी लागत आहे.
--कोट
कच्च्या मालाच्या दरांत वाढ झाल्याने तयार फराळाच्या पदार्थांच्या किमतीत सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागरिकांकडून फराळाला मागणी आहे; मात्र पूर्वीच्या तुलनेत खरेदीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे.
- वैभव साबळे, फराळ विक्रेता
....................
असे आहेत दर (प्रतिकिलो)
चिवडा विविध प्रकारात...............२२० ते ३६०
करंजी..........................३२० ते ५४०
चकली..........................२२० ते ६४०
लाडू विविध प्रकारात.................२८० ते १०००
शंकरपाळे........................२२० ते ३२०
अनारसे.........................३६० ते १०००
शेव...........................२२० ते ३००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.