पान-३
------------
३०-२
डोंगराळे यात्रेत खूनप्रकरणी
गौरव हडप याला जन्मठेप
गोकूळ अहिरेला तीन वर्षे सक्तमजुरी
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ३१ : डाेंगराळे (ता. मालेगाव) येथे यात्रेत आलेल्या पिडीत मुलीचा विनयभंगप्रकरणी गोकूळ श्रावण अहिरे याला तीन वर्षे सक्तमजुरी तर पिडीत मुलीच्या आई वडिलांनी जाब विचारल्याने गौरव हडप (रा. सोनार गल्ली, चितोड, धुळे) याने चाकूने अर्जुन ठाकरे यांच्या मांडीवर वार करून खून केल्या प्रकरणी येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी येथील न्यायालयात चार वर्षापासून खटला सुरू होता.
------------
डोंगराळे (ता. मालेगाव) येथे ९ ऑक्टोबर २०२२ ला जैतोबा महाराज यात्रेत पिडीत मुलगी धुळे जिल्ह्यातून तिच्या नातेवाइकांबरोबर यात्रेत आली होती. यात्रेतील झोक्यात तिच्या मैत्रिणीसोबत बसलेली असताना तेथे उपस्थित गोकूळ श्रावण अहिरेने पिडीत अल्पवयीन मुलीला ओढून तिच्या मांडीवर हात फिरवला.‘माझ्यासोबत फिरायला चाल’ असे सांगत तिच्यासोबत गैरवर्तन केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घडलेला प्रकार पिडीत मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितला. त्यानंतर आरोपी गोकूळ अहिरे हा त्यांच्या समोर आला. त्यावेळी मुलीची छेड का काढली असे पिडीत मुलीचा नातेवाईक ऋषिकेश ज्ञानेश्वर भील (रा. पारोळा) याने गोकूळला विचारले. त्यानंतर गोकूळचा मित्र गौरव दादाजी हडप याने त्याच्या पायातील बुटातील चाकू काढून ऋषिकेशवर वार केला. तेथे उपस्थित असलेले अर्जुन धनसिंग ठाकरे हा भांडण सोडविण्यास गेला. गौरवने अर्जुन ठाकरेच्या मांडीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. यात अर्जुन गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला धुळे येथे गुन्हा दाखल झाला होता. घटना तालुका पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने येथे वर्ग करण्यात आला. या खटल्याचे कामकाज पोस्को न्यायालयातील न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात चालले. न्यायालयाने आरोपी गौरव हडप याला जन्मठेपेची शिक्षा व २५ हजाराचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याचा सश्रम कारावास आणि गोकूळ अहिरे याला तीन वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्षम कारावास, मृत अर्जुन ठाकरे याच्या वडिलांना ३१ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. सरकारी वकील संजय सोनवणे, एम. एस. फुलपगार यांनी १६ साक्षीदार तपासले. श्री. सोनवणे यांनी प्रखर युक्तिवाद केला.