पान-३
-------------
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
आजपासून अग्रिम वाटप
दुष्काळाचे संकट : सहा लाख ८७ हजार लाभार्थी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३ : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी राज्य सरकारतर्फे ५ हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून (ता.४) मदतीचे वाटप सुरु होणार असून १३ तालुक्यातील ६ लाख ८७ हजार ६५ शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. मदतीची रक्कम परस्पररित्या कर्जखात्यात वर्ग करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला बँकांना दिला आहे.
पावसाने ओढ दिल्याने यंदा जिल्ह्यात खरीप हंगाम वाया गेला. जिल्ह्यातील दुष्काळ घोषित झालेल्या १३ तालुक्यामध्ये पंचनामे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी तातडीची म्हणून ५ हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने केलेल्या १३ तालुक्यात केलेल्या पंचनाम्यांमध्ये ३,३०६ गावांतील तब्बल ६ लाख ४४ हजार २८९ हेक्टरचे नुकसान झाल्याचे समोर आले. परिणामी ६ लाख ८७ हजार ६५ शेतकरी बाधित झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी ६५८ कोटी ६० लाख ३६ हजारांची अनुदानाची मागणी सरकारकडे नोंदविली आहे. परंतु, नुकसानीची ही रक्कम तातडीने मिळणार नसली तरी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत शेतकऱ्यांच्या बँकखात्यात वर्ग केली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे बाधित शेतकऱ्यांपैकी ९० टक्के शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली असून उर्वरित शेतकऱ्यांची पडताळणी चोवीस तासात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ज्यांची पडताळणी पूर्ण झाली त्यांच्या बँकखात्यावर तातडीची ५ हजारांची मदत बुधवारपासून (ता.३) वर्ग करण्यास सुरवात होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
---
१६-१
... तर बॅंकावर कारवाई होणार
जिल्ह्यातील दुष्काळ बाधित शेतकऱ्यांच्या बँकखात्यात प्रत्येकी पाच हजारांची अग्रिम जमा केली जाणार आहे. या अग्रिम मदतीतून तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या अनुदानातून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना दिले आहेत. ही रक्कम होल्ड अथवा कपात करता येणार नाही. आदेशाचे भंग करणाऱ्या बँकावर अन्यथा महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
--------------------