धुळे ः टुडे ३ साठी, अँकर
---
फोटो क्रमांक ः 31222
शिंदखेडा ः तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करताना जयकुमार रावल. शेजारी अधिकारी, शेतकरी.
---
पिके करपली; आशा, लढण्याची जिद्द अजूनही कायम
शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पालकमंत्री रावल बांधावर; जिल्ह्यास दहा महिने कठीण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः कुठे वाढ खुंटलेला कापूस, कुठे बोंडातच अडकलेली शेतकऱ्यांची आशा, तर कुठे पाण्याअभावी पूर्ण वाढ न झालेला मका... अशा दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शिंदखेडा आणि साक्री तालुक्यांतील शेतशिवारांना प्रत्यक्ष भेट दिली.
चिमठाणे-शेवाडे रस्त्यालगतच्या अमराळे, अरावे (ता. शिंदखेडा), तसेच छावडी (ता. साक्री) परिसरातील शेतांच्या बांधावर जात पालकमंत्री रावल यांनी कापूस, मका व अन्य पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पावसाअभावी खुंटलेली वाढ, न भरलेली कणसे आणि न फुटलेली बोंडे पाहिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई, जनावरांचा चारा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मंत्र्यांसमोर मांडला.
पाण्याचे नियोजन
नुकसानीची तीव्रता प्रत्यक्ष दिसत असल्याचे सांगत पालकमंत्री रावल म्हणाले, की कापूस व मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता चालू नुकसानीसोबतच पुढील दहा ते बारा महिन्यांचा विचार करणे गरजेचे आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि उपलब्ध पाण्याचे नियोजन या बाबींना शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
वंचित ठेवू नये
धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील शेतकरी दुष्काळी मदतीच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असा धीर त्यांनी दिला. शासनाची मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने गतीने काम करावे आणि कोणताही पात्र शेतकरी यापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
प्रत्येक थेंब जपा
पुढील पावसाळ्यापर्यंत जवळपास दहा महिने आणि तीव्र उन्हाळ्याचा काळ आपल्याला या परिस्थितीशी सामना करत काढायचा आहे. त्यासाठी आजपासूनच पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे आवाहन त्यांनी केले. उपलब्ध चारा व साधनसामग्री वाचवून कमी पाण्यात शक्य असलेल्या शेतीचा पर्याय अवलंबावा लागेल, असे ते म्हणाले.
समन्वयाने काम करा
मदत केवळ जाहीर होऊन चालणार नाही, ती वेळेत शेतकऱ्यांच्या हातात पडली पाहिजे. त्यासाठी पंचनामे व कागदपत्रांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आदेश पालकमंत्री रावल यांनी अधिकाऱ्यांना दिले. कागदोपत्री प्रक्रिया अडथळा ठरू नये आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना त्यांनी केली.
निश्चित मात करू
दुष्काळाच्या या कठीण काळात संवेदनशील प्रशासनाची साथ आणि योग्य नियोजनाच्या बळावर या संकटावर निश्चितच मात करता येईल, असा विश्वास या पाहणीदरम्यान व्यक्त करण्यात आला. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, शिंदखेड्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे, साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, शिंदखेड्याचे तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी, साक्रीचे तालुका कृषी अधिकारी वाय. डी. सोनवणे, शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.