ॲंकर
दुष्काळी मदतीसाठी संमतीचे आवाहन
पात्र शेतकऱ्यांना पाच हजारांची अग्रिम मदत
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. ३१ : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असून, बागलाण तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सामाईक खातेदारांचे संमतीपत्रक तत्काळ सादर करावेत, असे आवाहन बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे.
शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या परिपत्रकानुसार, दुष्काळग्रस्त घोषित ३०४ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्यात येणार आहे. यासाठी विशेष संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून, तहसीलदारांमार्फत लाभार्थ्यांची माहिती निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
या योजनेत एका व्यक्तीला केवळ एकदाच पाच हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. शेतजमीन सामाईक खात्यावर असल्यास संबंधित खातेदारांमध्ये संमती आवश्यक आहे. सर्व खातेदारांनी संमतीपत्र दिल्यानंतर त्यांच्यापैकी एका शेतकऱ्याच्या नावे मदत वितरित केली जाईल. मात्र, सामाईक खातेदारांची संमती नसल्यास संबंधित खात्यातील कोणत्याही खातेदाराला अग्रिम मदतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे परस्पर समन्वय ठेवून संमतीपत्राची प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी, असे चावडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शेतकऱ्यांना जाहीर झालेली नुकसानभरपाई लवकर वितरित करण्यासाठीही प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. अग्रिम मदतीमुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार मिळणार आहे. गावपातळीवरील महसूल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून संमतीपत्र सादर करण्याची पद्धत आणि आवश्यक तपशील आधीच जाणून घ्यावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.
कोट
एका व्यक्तीला केवळ एकदाच पाच हजार रुपयांची अग्रिम मदत मिळणार आहे. सामाईक खातेदारांनी परस्पर संमतीपत्र देऊन एका खातेदाराच्या नावे लाभ घ्यावा. संमतीपत्र नसल्यास संबंधित सामाईक खात्यातील कोणत्याही खातेदाराला मदतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व संबंधित खातेदारांनी तत्काळ संमतीपत्र सादर करावे.
— कैलास चावडे, तहसीलदार, बागलाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.