Dugarwadi Waterfall news
Dugarwadi Waterfall news esakal
नाशिक

दुगारवाडी घटना : आई-पत्नीच्या डोळ्यांदेखत ‘त्याला’ जलसमाधी

नरेश हाळणोर

नाशिक : दुगारवाडी धबधब्यावर आई, पत्नी अन् दोन मुलांसह तो पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आला होता. दुपारपर्यंत साऱ्यांनी तेथील निसर्ग अन्‌ वाहणाऱ्या धबधब्याचा मनसोक्त आनंद घेतला. मोकळ्या आकाशाखाली निसर्गाची हिरवाई न्याहाळत ते धबधबा ओलांडून पलीकडे गेले.

याचदरम्यान ढग दाटून आले अन्‌ मुसळधाररेमुळे धबधब्याचा जोर वाढला. त्यामुळे अडकून पडल्याने ‘त्याने’ पलीकडे जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. पलीकडे जात असताना काही पावलांचे अंतर राहिलेले असताना त्याचा हात निसटला आणि जन्मदात्री आई, जन्माची सोबतीण अन्‌ दोन चिमुकल्यांच्या डोळ्यांदेखत ‘तो’ पाण्यात नाहीसा झाला... (Dugarwadi incident man drowned in water under infront of his mother wife nashik Latest Marathi News)

दुगारवाडी धबधबा येथे रविवारी (ता. ७) सायंकाळी अडकून पडलेल्या पर्यटकांपैकी एकजण वाहून गेला. अविनाश हरिदास गरड (४०, रा. चित्तरंजन हौसिंग सोसायटी, गणेशनगर, जेल रोड, दसक) असे वाहून मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अविनाश मूळचे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईचे. सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये ते कंपनीत नोकरीला होते. रविवारी (ता. ७) सुटीमुळे अविनाश आई छाया गरड (६०), पत्नी राणी गरड (३७), मुलगी इशू गरड (१२), आयु गरड (२) यांच्यासमवेत पावसाळी पर्यटनासाठी दुगारवाडी धबधबा येथे आले होते. दुपारपर्यंत दुगारवाडी धबधबा परिसरात पाऊस नसल्याने गरड कुटुंबीयांनी पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटला.

दुपारनंतर धबधबा ओलांडून ते पलीकडच्या डोंगरावर गेले. त्यानंतर मात्र वातावरण बदलून सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्राचा परिसर असल्याने धबधब्याच्या पातळीत वाढ होऊन तो धो-धो वाहू लागला. त्यामुळे धबधबा ओलांडणे गरड कुटुंबीयांसह अडकून पडलेल्यांना जिकिरीचे झाले होते.

मात्र अविनाश यांनी धाडस करून धबधबा ओलांडण्याचा निर्णय घेतला आणि ते पाण्यात उतरले. कुटुंबीय आणि अडकलेल्या पर्यटकांनी अविनाश यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातच मोबाईलला रेंज नसल्याने अडकलेल्यांना कोणाशी संपर्कही साधता येत नव्हता, असे असतानाही अविनाश पलीकडे पोचण्यासाठी काही पावले अंतर राहिलेले असताना त्यांचा हात निसटला आणि ते पाण्याच्या प्रवाहात पडले.

काही क्षणामध्ये ते दिसेनासे झाले आणि कडेला थांबलेल्या त्यांच्या आई अन्‌ पत्नीच्या मनात धस्स झालं. आई, पत्नी अन्‌ मुलांच्या डोळ्यादेखत अविनाश पाण्याच्या प्रवाहात दिसेनासे झाल्याने त्यांनी हंबरडा फोडला.

सापगाव ग्रामस्थ धावून आले

दुगारवाडी धबधब्या पलीकडे पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच सापगावच्या ग्रामस्थांनी दोरखंडासह घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती तत्काळ त्र्यंबकेश्‍वर पोलिस, आपत्कालीन कक्षाला देण्यात आल्याने तेही काही मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले.

नाशिक ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे याच्यासह शासकीय अधिकारी घटनास्थळी पोचले. अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी आणण्यासाठीचे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. तर काही जणांच्या पथकाने पाण्यात वाहून गेलेल्या अविनाश यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली.

मोबाईलच्या बॅटरीत शोधमोहीम

अंधार दाटू लागल्यानंतरही मध्यरात्रीपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन आणि शोधमोहीम सुरू होती. यादरम्यान आपत्कालीन पथकाकडे असलेल्या बॅटऱ्यांची चार्जिंग संपल्याने त्या बंद पडल्या.

त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोबाईलच्या बॅटरीचा वापर करून ही मोहीम राबविली. मध्यरात्रीचे अडीच-तीन होऊनही अविनाश न मिळाल्याने शोधकर्त्यांनी त्यांच्या जिवंत असण्याची आशा सोडली अन्‌ मोहीम थांबविली.

"एका आईसमोर तिचा मुलगा, पत्नीसमोर तिचा पती, मुलांसमोर त्यांचा पिता अचानक दिसेनासा होतो. खूपच हृदयद्रावक अशी ही घटना होती. शोधमोहीम राबविताना ते जिवंत मिळावेत, अशीच आमची अपेक्षा होती. त्यासाठी गडद अंधारातही आम्ही शोधमोहीम राबविली. परंतु, वेळ जात होता तसतशी आशा सुटत होती. शेवटी तसेच घडले. सोमवारी (ता. ८) दुपारी त्यांचा मृतदेह हाती लागला. नागरिकांनी नक्कीच पर्यटनासाठी जावे; परंतु उगीच धाडस करू हेच आवाहन."

- माधुरी कांगणे, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT