आतषबाजीसाठी सायंकाळी ७ ते रात्री दहापर्यंत मुभा
---
ध्वनी, वायूप्रदूषण टाळण्यासाठी निर्देश; पर्यावरणपूरक दिवाळी करा साजरी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ध्वनी व वायूप्रदूषण टाळण्यासाठी जिल्ह्यातील फटाके विक्रेते, नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री व वापर करू नये, तसेच फटाके वाजविण्यासाठी केवळ सायंकाळी सात ते रात्री दहा ही वेळ निश्चित केली आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक व सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाका विक्रेत्यांनी स्फोटक अधिनियम १८८४ व स्फोटक नियम २००८ मधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय हरित लवादांच्या ३ नोव्हेंबर २०२३ च्या आदेशानुसार, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाके वाजविण्याच्या वेळेचे पालन करणे बंधनकारक आहे.
शैक्षणिक संस्थांनी फटाक्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे. पोलिस प्रशासनाने आदेशांची अंमलबजावणी करावी, तर महापालिका व नगरपालिका अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन होत असल्याची पडताळणी करून दक्षता घ्यावी.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ध्वनी व पर्यावरणीय प्रदूषणासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी जळगाव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. नागरिकांनी तक्रारींसाठी ०२५७-२२२१२८८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा srojalgaon@mpcb.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा. प्राप्त तक्रारींवर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
चौकट
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी मातीचे दिवे व पणत्या उजळाव्यात, प्लॅस्टिकचा वापर टाळून कागदी किंवा कापडी आकाशकंदील लावावेत, फटाक्यांचा वापर टाळावा. तसेच प्लॅस्टिकऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा, झाडांवर रोषणाई करू नये आणि टाकाऊ व पुनर्वापरयोग्य वस्तूंचा वापर करावा. फटाकेमुक्त, प्लॅस्टिकमुक्त, कचरामुक्त व प्रदूषणमुक्त हरित दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही अपर जिल्हा दंडाधिकारी चव्हाण यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.