लोगो : तयारी दिवाळीची
---
फोटो : A15107
नाशिक : बाजारात विक्रीस आलेले आकर्षक आकाशकंदील
--
बाजारपेठेत इको-फ्रेंडली आकाशकंदिलांची धूम
कच्चा माल महागल्याने किमतीत १० टक्क्यांनी वाढ
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. २८ : आकर्षक व विविधरंगी आकाशकंदिलांनी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. नावीन्यपूर्ण आकार, प्रकार आणि डिझाईनमध्ये आकाशकंदील विक्रीस दाखल झाले असून, पारंपारिक, टिकाऊ व इको-फ्रेंडली कंदिलांना सर्वाधिक मागणी होत आहे.
दसरा संपताच नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली असून, दीपोत्सवाचा सण जवळ आल्याने आकर्षक आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
टिकाऊ आणि इको-फ्रेंडली वस्तूंपासून तयार केलेल्या कंदिलांना अधिक मागणी होताना दिसत आहे. विविध आकार, प्रकार आणि आकर्षक नक्षीकाम केलेले ३ इंचापासून ते ६ फुटांपर्यंतचे आकाशकंदील बाजारात विक्रीस आले असून नागरिकांचा खरेदीकडे अधिक कल दिसून येत आहे. जागोजागी दुकाने सजली आहेत. विशेष म्हणजे, या शहरातून अन्य जिल्ह्यांमध्येही आकाशकंदील निर्यात होत आहेत; त्यामुळे सध्या हे शहर आकाशकंदिलांचे माहेरघर ठरत आहे. बाजारात ५० रुपये डझनपासून ते ५,००० रुपयांपर्यंत एक या दराने आकाशकंदील विक्री होत आहेत. दरम्यान, कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे आकाशकंदिलांच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. षटकोनी, डायमंड, स्टार, चौकोन, खणाचे कंदील, जाणता राजा, स्वामी समर्थ, फोटो फ्रेम तसेच वॉटरप्रूफ आणि मॅजिक स्टार अशा विविध प्रकारांत आकाशकंदील विक्रीस आले आहेत. खणाची साडी, वेलवेट कापड, रंगबिरंगी साधे आकर्षक कापड, बांबूपासून तयार कामट्या, पुठ्ठा, ज्युट, ओली पेपर, लेस व रेशमी दोरी यांचा वापर आकाशकंदील बनवण्यासाठी केला जातो.
---चौकट
पारंपरिक कंदिलांच्या मागणीत मोठी
पूर्वी चीनमधून विविध प्रकारचे आकर्षक आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी येत असत. त्यांचे दरही कमी असल्यामुळे नागरिकांचा त्यांच्या खरेदीकडे अधिक कल होता. मात्र, चायनीज वस्तूंवर बंदी घातल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बाजारात चायना आकाशकंदील दिसून येत नाहीत. परिणामी, पारंपरिक आकाशकंदिलांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, कंदील विक्रेत्यांकडूनही याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
---कोट
फोटो : A15106
आकाशकंदिलाची यंदाची बाजारपेठ चांगली आहे. इको फ्रेंडली आणि फॅन्सी कंदिलांना अधिक मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे.
- प्रशांत कदम, विक्रेता