पान-४ मेन
YEO26B26994
नागडे : मातीमोल भावामुळे कोबीच्या शेतात सोडलेल्या मेंढ्या दुसऱ्या छायाचित्रात ट्रॅक्टर द्वारे नांगरणी करताना
----------
तीन एकर कोबीवर फिरविला रोटावेटर
अगोदर सोडल्या मेंढ्या ः किलोला दोन रुपये भाव मिळाल्याने नागडेतील शेतकऱ्याचा संताप
------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.३ : दुष्काळाच्या झळा सोसत, पाण्याचे काटेकोर नियोजन करून तीन एकरांवर उभे केलेले कोबीचे पीक बाजारभावाच्या पडझडीमुळे अक्षरशः मातीत मिसळण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. नागडे शिवारातील शेतकरी गुलाबराव सोनवणे यांनी सुमारे तीन लाख रुपये खर्च करून उभ्या केलेल्या कोबीला अवघा दोन रुपये किलोचा भाव मिळू लागल्याने संतप्त होऊन पिकात मेंढ्या चरण्यास सोडल्या. त्यानंतर रोटावेटर फिरवून संपूर्ण उभे पीक नष्ट केले.
बाजारभावाच्या अनिश्चिततेने शेतकऱ्याला उत्पादन खर्चही वसूल करता येत नसल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. सोनवणे यांनी पाण्याचे नियोजन करून तीन एकर क्षेत्रात कोबीची लागवड केली. रोपे, मजुरी, रासायनिक खते, निंदणी तसेच ट्रॅक्टर मशागत यासाठी त्यांनी सुमारे तीन लाख रुपये खर्च केले. पीक काढणीला आल्यानंतर सुरुवातीला साडेसहा रुपये किलोचा भाव मिळाला. त्यातून १२ टनाची एक गाडी बाजारात पाठवून सुमारे ८० हजार रुपये मिळाले. मात्र, त्यानंतर आवक वाढल्याने भाव झपाट्याने घसरला. कोबीचा दर अवघा दोन रुपये किलोवर आला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याने उर्वरित पीक विकणेही परवडेनासे झाले.
अशा परिस्थितीत सोनवणे यांनी तीन एकर कोबीच्या शेतात मेंढ्या सोडल्या. त्यानंतर रोटावेटरच्या साहाय्याने उभे पीक नष्ट केले.भाजीपाला पिकांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आवक वाढली की दरात मोठी घसरण होते. परिणामी उत्पादन खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याची व्यथा सोनवणे यांनी व्यक्त केली.
------------
कोट
भाजीपाला पिकाला शाश्वत बाजारपेठ नाही. थोडी जरी आवक वाढली तरी बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडतात. तीन एकर कोबीवर मोठा खर्च केला, मात्र आता दोन रुपये किलोनेही खरेदीदार मिळत नाही. त्यामुळे मेंढ्या सोडून पीक नष्ट करण्याची वेळ आली.
- गुलाबराव सोनवणे, शेतकरी
-----------------