फोटो:14814
ओझर ः टॉवर लाइन बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीप्रसंगी माजी आमदार अनिल कदम, शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील.
महापारेषणचे अधिकारी व बाधित शेतकरी.
शेतकऱ्यांच्या संमतीनेच टॉवर लाइनचे काम करा
अनिल कदम ः ओझर येथे बाधित शेतकऱ्यांची बैठक
ओझर, ता. ७ ः ओझर, खेरवाडी, दात्याने, कसबे सुकेणे, वडाळीनजीक परिसरासह विविध गावांत हाय टेन्शन वीज टॉवर लाइनचे काम सुरू असून, यामुळे अनेक शेतकरी बाधित होत आहेत. मात्र, संबंधित शेतकऱ्यांची पूर्वसंमती, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि योग्य मोबदल्याबाबत स्पष्टता नसतानाही काम सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्याने निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली.
ओझर येथे टॉवर लाइन बाधित शेतकरी आणि महापारेषणच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींमधून वीज टॉवर व वाहिन्या उभारल्या जात असताना त्यांच्या हक्कांचा, शेतीच्या नुकसानीचा विचार केला जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
या वेळी अनिल कदम यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय आणि त्यांना कायद्यानुसार योग्य मोबदला मिळाल्याशिवाय टॉवर लाइनचे काम पुढे नेऊ देणार नाही, असा इशारा अनिल कदम यांनी दिला. बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत टॉवर उभारणीचे काम थांबवावे तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर, पिकांचे नुकसान, पिकांवर होणारा परिणाम, भविष्यातील अडचणी तसेच टॉवर व वीजवाहिन्यांमुळे निर्माण होणारे प्रश्न यांचाही विचार करणे आवश्यक असून, प्रशासकीय आदेश दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनीवर काम करण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
बैठकीस महापारेषणचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे, कार्यकारी अभियंता अनंत काळुसे, उपकार्यकारी अभियंता रवींद्र पावरा, सहाय्यक अभियंता आकाश हुच्चे, शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, गटनेते सुनील कदम, नगरसेवक वृषाल पगार, रवींद्र शिंदे, रोहित लभडे, रामनाथ वाबळे, शालिग्राम कदम, विजय भडके, आण्णासाहेब भडके, बालकृष्ण मंडलिक, भास्कर गवळी, अनिरुद्ध पवार, वसंत गुरगुडे, विक्रम पवार, भूषण गुरगुडे, सुनीत गांधी, बंडू बैरागी, कैलास सांगळे आदी उपस्थित होते.
..............