टुडे एक ॲंकर
---------
(खतांचा संग्रहित फोटो वापरावा)
----
खते खरेदीसाठी आता ‘फ्रेमवर्क सेल’ प्रणाली
जिल्ह्यात कार्यान्वित; घरबसल्या उपलब्धता, ऑनलाइन बुकिंग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२३ : शेतकऱ्यांना खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ या नवीन खत खरेदी-विक्री प्रणालीची अंमलबजावणी गुरुवारपासून (ता. २२) करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार खतांची उपलब्धता जाणून घेणे, खत विक्री केंद्राची निवड करणे आणि खतांचे बुकिंग करणे अधिक सोयीचे होत आहे.
सध्याच्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक खतांच्या उपलब्धतेची माहिती घेण्यासाठी तसेच खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांना भेट द्यावी लागते. अनेकदा खत खरेदीसाठी रांगेत थांबावे लागते. मात्र, एफएफएस’ प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या परिसरातील खत विक्री केंद्रांमध्ये कोणती खते उपलब्ध आहेत, याची माहिती मिळवता येणार आहे. तसेच, आवश्यकतेनुसार उपलब्ध खतांचे आगाऊ बुकिंग करण्याची सुविधाही मिळणार आहे.
शेतजमिनीच्या आधारे क्यूआरकोड
या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या तपशिलांच्या आधारे आवश्यक डिजिटल प्रक्रिया पूर्ण करून क्यूआर कोड उपलब्ध करून दिला जाईल. शेतकरी संबंधित प्रणालीतून सूचित करण्यात आलेल्या खत विक्री केंद्रावर जाऊन हा क्यूआर कोड दाखवू शकतील. त्यानंतर खत विक्रेत्याकडून क्यूआर कोड स्कॅन करून आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानुसार शेतकऱ्यांना खत खरेदी करता येईल.
सक्ती रोखण्यास मदत
खत खरेदी करताना काही ठिकाणी शेतकऱ्यांना इतर कृषी निविष्ठा किंवा उत्पादने खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी आढळतात. एफएफएस प्रणालीमुळे खतांची उपलब्धता, बुकिंग आणि विक्री यामध्ये अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल.
चौकट
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी उपयुक्त
खतांच्या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढविणे, खतांचा अनधिकृत साठा व वळवणूक रोखणे आणि खतांचा कृषीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी होणारा वापर नियंत्रित करणे, या दृष्टीनेही एफएफएस प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. खतांच्या खरेदी-विक्री प्रक्रियेचे डिजिटल पद्धतीने व्यवस्थापन केल्यामुळे खत वितरणावर देखरेख ठेवणे अधिक सुलभ होईल.
कोट
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी कार्यान्वित झालेल्या एफएफएस प्रणालीची माहिती करून घ्यावी आणि उपलब्ध डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा.
- के. एम. तडवी,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.