दिंडोरी (जि.नाशिक) : तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची १७ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी सहा व्यापाऱ्यांविरुद्ध दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पाच व्यापाऱ्यांना अटक केली असून, एक संशयित अद्याप फरारी आहे. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Five-traders-arrested-for-fraud-with-grape-growers)
दिंडोरी पोलिसांची कारवाई; एक संशयित फरारी
दिंडोरी तालुक्यातील सुनील शिंदे (वलखेड), अनिल मालसाने (निगडोळ), संजय वाघ (नळवाडी), शरद मालसाने (निगडोळ) व रघुनाथ पाटील (वरखेडा) यांनी संशयित व्यापाऱ्यांना द्राक्षमाल विक्री केला होता. मात्र, मालाचे पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. शेतकऱ्यांना दिलेले धनादेश न वठल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. वारंवार संपर्क करूनही व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अखेर द्राक्ष उत्पादकांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत भूषण पवार (रा. देवपूर), विशाल विभूते (रा. धुळे), अमोल चव्हाण (रा. कोथरूड), सागर जगताप (रा. बारामती), संतोष बोराडे (रा. निफाड) यांना अटक केली, तर पुणे येथील पाडवा ग्रीन सोल्युशन्स कंपनीचा भागीदार अमित देशमुख (रा. मध्य प्रदेश) अद्याप फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शिष्टमंडळाने घेतली पोलिस अधीक्षकांची भेट...
दिंडोरी, निफाड व चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांची दोन ते तीन कोटींची फसवणूक झाल्याची चर्चा असून, फसवणूक झालेले शेतकरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार, पोलिस अधीक्षकांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.