नाशिक : राज्यामध्ये संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांची संख्या चार कोटी 95 लाखांपर्यंत आहे. त्यांपैकी तीन कोटी 90 लाख असंघटित क्षेत्रातील असून, 70 टक्के मनुष्यबळ शेतीच्या रोजगारावर अवलंबून आहे. बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजारांच्या सहाय्याचा निर्णय झाल्यानंतर लॉकडाउनमध्ये बसून असलेल्या उर्वरित "वर्कफोर्स'ला सरकारकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे.
असंघटित क्षेत्राला पाच हजारांच्या मदतीतून सामाजिक सुरक्षा हमीची मागणी
असंघटित क्षेत्रातील प्रत्येकाला पाच हजारांची मदत करून सरकारने सामाजिक सुरक्षेची हमी द्यायला हवी, अशी मागणी कामगार हक्क अभियानाचे अध्यक्ष कैलास मोरे यांनी केली आहे. मोरे म्हणाले, की सामाजिक सुरक्षा कायदा लागू असल्याने रोजगार गेलेल्यांना मदत करायला हवी. मोलकरीण महामंडळ, माथाडी मंडळ, सुवर्णजयंती शहरी रोजगार, सुरक्षारक्षक मंडळ अशा गरिबांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांमधून सरकारने कोरोनामुळे रोजगार हिरावून घेतलेल्यांना सरकारने मदत करणे अपेक्षित आहे. राज्यामध्ये 20 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यातील 12 लाख कामगारांनी पुनर्नोंदणी केली आहे. कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना दोन हजारांचे सहाय्य मिळणार आहे. तशी मदत इतर क्षेत्रातील असंघटितांना व्हायला हवी. एवढेच नव्हे, तर अन्नसुरक्षा कायदा लागू असल्याने रेशनकार्ड नसलेल्यांना आधारकार्डच्या आधारे धान्य उपलब्ध करून द्यायला हवे. महापालिकेच्या अंदाजपत्रकामधून शहरातील आणि जिल्हा परिषदेने सेसमधून ग्रामीण भागातील गरिबांसाठी मदत करण्याचे उत्तरदायित्व दाखवायला हवे.
चंडीगडच्या संस्थेचे सर्वेक्षण
चंडीगड लेबर ब्युरोतर्फे 2014 मध्ये बेरोजगारी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यात तीन कोटी 65 लाख असंघटित क्षेत्रातील कामगार असल्याचे आढळून आले होते. शिवाय उत्पादकतेत सहभाग असलेल्या आणि नोंदणी झालेल्या कामगारांची संख्या 28 लाख इतकी आहे. व्यवसाय आणि सेवा क्षेत्रातील कामगार 75 लाख, मोलकरीण महामंडळाकडे नोंद असलेल्या घरकाम करणाऱ्या पाच लाख महिला, दोन लाख माथाडी कामगारांपैकी एक लाख पाच हजार कार्यरत, 14 मंडळांकडे नोंदणी झालेले 40 हजार सुरक्षारक्षक आहेत. याशिवाय हातमाग महामंडळाच्या अखत्यारीत मजूर-कामगार आहेत. अशा साऱ्या हातावरचे पोट असलेल्या कष्टकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम सरकारने करायला हवे, असा मोरे यांचा आग्रह आहे.
हेही वाचा > VIDEO : ह्रदयद्रावक! लॉकडाऊनमध्ये माऊलीच्या नशिबाची दैना..वंशाचे दोन-दोन दिवे असूनही तिचे जीवन रस्त्यावरच!
नाशिकमध्ये पाच लाखांचा रोजगार बुडाला
नाशिक जिल्ह्यात पाच लाख कष्टकऱ्यांचा रोजगार बुडाला आहे. अश्वमेध सामाजिक संस्था आणि कामगार हक्क अभियानातर्फे संकलित केलेल्या माहितीनुसार क्षेत्रनिहाय रोजगार बुडालेल्या कष्टकऱ्यांची संख्या अशी ः कृषी- एक लाख, औद्योगिक वसाहतींमधील कंत्राटी कामगार-छोटे व्यावसायिक- एक लाख, मालेगावचे यंत्रमाग कामगार- 80 हजार, गॅरेज, दुकाने, हॉटेलशी संलग्न कामगार- 80 हजार, बांधकाम- 40 हजार, कचरा जमा करणारे- 25 हजार, घरकाम करणारे- 25 हजार, फेरीवाले आणि हॉकर्स- 10 हजार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.