खरातला चार दिवसांची पोलिस कोठडी
व्यापार वृद्धीसाठी ‘सिद्ध खड्या’ची अंगठी देत आर्थिक फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२ : व्यापारात मोठी वाढ होईल, असे आमिष दाखवून बनावट ‘सिद्ध खड्या’ची अंगठी देत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता. २) आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
नेवासा येथील कापड व्यावसायिक राजेंद्र भागवत यांना व्यापारवृद्धीचे आमिष दाखवून खरात याने सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे अडीच लाख रुपयांची रोकड घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर भागवत यांना ‘सिद्ध खड्या’ची अंगठी देण्यात आली. मात्र, ती अंगठी धातूची असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सरकारवाडा पोलिसांनी बुधवारी (ता. ३०) खरात याला ताब्यात घेतले होते. शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आणखी पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली. आर्थिक व्यवहार, फसवणुकीची पद्धत आणि अन्य बाबींचा तपास करण्यासाठी तसेच आरोपीकडून आणखी माहिती व पुरावे मिळण्याची शक्यता असल्याने कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. बचाव पक्षाने तपास मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचे सांगत कोठडीला विरोध केला.
दरम्यान, खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक व अत्याचाराचे एकूण दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. अन्य प्रकरणांत तो न्यायालयीन कोठडीत असल्याचेही सांगण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणाचा पुढील तपास सरकारवाडा पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.