ॲंकर
NSK26H35037
जळगाव : सुप्रीम कॉलनीतील विठ्ठल मंदिर परिसरात न्याय विश्वास फाउंडेशनतर्फे आयोजित मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात नागरिकांना मार्गदर्शन करताना संस्थापक ॲड. अनिकेत निकम व उपस्थित मान्यवर.
कायदेविषयक शिबिरात ३०० नागरिकांना मार्गदर्शन
न्याय विश्वास फाउंडेशनचा सुप्रीम कॉलनीत उपक्रम; सहावे शिबिर उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर हक्कांची जाणीव व्हावी, तसेच न्यायप्रक्रियेविषयी असलेली भीती दूर व्हावी, या उद्देशाने न्याय विश्वास फाउंडेशनतर्फे सुप्रीम कॉलनीतील विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित सहाव्या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे ३०० नागरिकांनी सहभागी होत विविध कायदेशीर समस्यांबाबत तज्ज्ञ वकिलांकडून मार्गदर्शन घेतले.
१४ नोव्हेंबरला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर पार पडले. यावेळी तज्ज्ञ वकिलांच्या पथकाने नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील विविध कायदेशीर प्रश्नांचे सोप्या भाषेत निरसन केले. यामध्ये सातबारा उतारा, जमीन व मालमत्तेचे वारसाहक्क, फौजदारी खटले, कौटुंबिक व वैवाहिक वाद, महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांचे हक्क यांसह विविध विषयांचा समावेश होता. तसेच सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, ग्राहक तक्रारी, कामगार व वेतनविषयक प्रश्न, पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, विमा दावे आणि पॉलिसीविषयक अडचणींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी नागरिकांमध्ये न्यायप्रक्रियेविषयी असलेली भीती आणि कायद्याविषयीचे अज्ञान दूर करणे, हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. केवळ माहितीअभावी कोणालाही न्यायापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी फाउंडेशनचे कायदेविषयक जनजागृतीचे कार्य सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमास नगरसेविका अनिता बापसे, नलू सोनवणे, महेंद्र सोनवणे, नितीन चौगुले, विठ्ठल पाटील, दिलीप सोनवणे, चंदू बापसे, वाहेद खान यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी, धारकरी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. फाउंडेशनच्या यापूर्वी झालेल्या पाच शिबिरांच्या माध्यमातून राज्यभरातील पाच हजारांहून अधिक नागरिकांनी कायदेविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. आगामी काळातही गरजू नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी ९६५३६४७०७० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.