जिल्ह्यात गांधी जयंतीला ग्रामसभांचा प्रघात यंदा मोडीत
ग्रामसेवकांचा सामुहिक बहिष्कार; ‘स्त्री जन्माच्या’ स्वागताचा ठराव बारगळला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी ग्रामपंचायतींची ग्रामसभा घेण्याचा प्रघात यंदा मोडीत निघाला आहे. ग्रामसभेचे सचिव म्हणजे ग्रामसेवक संघटनेने ग्रामसभांवर सामूहिकरीत्या बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यात शुक्रवारी एकही ग्रामसभा पार पडली नाही.
नाशिक जिल्ह्यात १३८७ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक महिन्याला ग्रामसभा घेण्याचे आदेश असताना ऑक्टोबरची ग्रामसभा विशेषत: २ ऑक्टोबर रोजी होते. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी ‘स्त्री जन्माच्या’ स्वागताचा ठराव करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय केंद्र शासनाने सुचित्त केलेल्या १३ योजनांचा उत्सव साजरा करण्याचे निर्देश होते. यात जलजीवन मिशन, मनरेगा या योजनांचाही समावेश होता. प्रत्यक्षात या दोन्ही योजना सद्यःस्थितीला अपूर्ण असून त्यांचे पैसेही मिळत नसल्याने मक्तेदारांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा उत्सव साजरा करायचे म्हटले तरी गावकरी त्याला मान्यता देण्यास नकार देतात. गुरांना चारा, पाणी, शेती पिकांचे प्रश्न भेडसावत असताना शासकीय योजनांचा उत्सव साजरा करण्यासारखी स्थिती नसल्याचे ग्रामसेवकांनी म्हटले आहे. परिणामी, जिल्ह्यातील एकाही ग्रामसभेत सहभागी न होण्याचे ग्रामसेवक संघटनेने निर्णय घेतला आहे. ग्रामसेवकांना पोलिस सुरक्षा पुरविण्याची मागणी संघटनेने केली आहे. परंतु, सरकारने त्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्याच्या निषेधार्थ ग्रामसेवक संघटनेने असहकार आंदोलन पुकारले असून त्याचाच एक भाग म्हणून २ ऑक्टोबरची ग्रामसभा पुढील आठवड्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इतर शासकीय अधिकाऱ्याची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात येईल आणि त्यांच्या उपस्थितीत ही सभा होणार असल्याचे ग्रामसेवकांनी म्हटले आहे.
शासन निर्णयाचा आधार
ग्रामसेवक संघटनेने या ग्रामसभा न घेण्यामागे २७ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. या निर्णयानुसार, २६ जानेवारी वगळता उर्वरित दिवसांच्या ग्रामसभा या त्या महिन्यातील १५ दिवसांत घेण्याचे निर्देश आहेत. त्याआधारे ग्रामसेवकांनी २ ऑक्टोबर रोजी शासकीय सुटी घेतली. ग्रामसभा १५ दिवसांत घेण्यात येईल.
कोट
२७ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयानुसार २६ जानेवारी वगळता उर्वरित ग्रामसभा त्याच दिवशी न घेता त्या महिन्यात अन्य दिवशी घेण्याबाबत शासन निर्णय आहे. परंतु, तरीही २ ऑक्टोबरला ग्रामसभा घेण्याचे निर्देश होते. ग्रामपंचायत पोर्टलवर सभा घेण्याचे नियोजन तयार करण्यात आले नाही. म्हणून एकाही ठिकाणी ग्रामसभा झालेली नाही. पुढील आठवड्यापासून प्रशासक व सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामसभांचे आयोजन करण्यात येईल .मात्र ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी काम करणार नाहीत.
-संजय गिरी, सरचिटणीस, राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.