गांधी उद्यान परिसरात कोंडी
टाळण्यासाठी जागांचे नियोजन
२४ पैकी केवळ नऊ विक्रेत्यांकडे कागदपत्रे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : गांधी उद्यान परिसरातील हॉकर्सच्या जागेवरून होणारे वाद व त्यांना शिस्त लावण्यासाठी आणि वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने जागा व्यवस्थापनाची नवी आखणी करण्याचे नियोजन केले आहे. उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी आणि पथविक्रेता समितीच्या सदस्यांनी परिसराची पाहणी करून हॉकर्सच्या व्यवसायासाठी तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी जागा निश्चित करण्याबाबत चर्चा केली.
प्रस्तावित नियोजनानुसार उद्यानाच्या भिंतीलगत हॉकर्सना व्यावसायासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रस्त्याच्या विरुद्ध बाजूला वाहनांच्या पार्किंगसाठी जागा मोकळी ठेवण्याचे नियोजन आहे. यामुळे व्यावसायिकांची गर्दी आणि रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
नऊ जणांकडेच कागदपत्रे
गांधी उद्यान परिसरात सध्या २४ हॉकर्स व्यवसाय करीत असल्याची माहिती पाहणीदरम्यान समोर आली. मात्र, यापैकी केवळ नऊ व्यावसायिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे आपली कागदपत्रे सादर केली. सन २०१४ मधील नोटरी असलेल्या नोंदणीकृत हॉकर्सना जागावाटपात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चौकट
दीड फुटाचे अंतर ठेवा
दरम्यान, उपलब्ध जागेत अधिकाधिक व्यावसायिकांना सामावून घेण्यासाठी दोन दुकानांमध्ये किमान दीड फुटाचे अंतर ठेवण्याची सूचना पथविक्रेता समितीच्या सदस्यांनी केली. जागांचे नियोजन करताना नोंदणीकृत हॉकर्सचे हक्क, व्यवसायासाठी आवश्यक जागा आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही, यांचा समतोल साधण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.