फोटो : 05370
घोटी : महामार्गावर अर्धवट जाळलेला, दुर्गंधीयुक्त कचरा.
घोटी परिसरात कचऱ्याचे ढीग
जाळलेल्या कचऱ्याच्या धुराने नागरिक त्रस्त; विद्यार्थी, शिक्षकांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
घोटी, ता. ५ : शहर परिसरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहर तसेच बाहेरील कचरा महामार्गालगतच्या मोकळ्या जागांवर टाकला जात असल्याने या परिसराचे कचराकुंडीत रूपांतर होत आहे. त्यातच कचऱ्याला आग लावली जात असल्याने दिवस-रात्र धुराचे लोट महामार्गावर पसरत असून, वाहनचालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होतो.
रात्री काही अज्ञात वाहने महामार्गालगत कचरा टाकतात. काही ठिकाणी खासगी, तर काही ठिकाणी वन विभागाच्या हद्दीलगत कचरा टाकला जातो. त्यामुळे हा प्रश्न स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता पर्यावरण, आरोग्याचा बनला आहे.
कचऱ्याच्या ढिगांमध्ये मांसाहारी पदार्थांचे टाकलेले अवशेष आढळत असल्याने परिसरात उग्र दुर्गंधी पसरत आहे. कुजलेल्या अवशेषांमुळे माशा, भटकी कुत्री आणि इतर जनावरे जमा होतात. त्यामुळे महामार्गालगतचा परिसर नागरिक आणि वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर महामार्गावर येत असल्याने वाहनचालकांच्या दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो. शाळा-महाविद्यालये आणि नागरी वस्तीजवळ कचरा जाळला जात असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मुंबई-नाशिक मार्गावरून राज्यातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी, राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच हजारो नागरिकांची वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या परिसरातच कचऱ्याचे ढीग, धुराचे लोट आणि मृत जनावरांचे अवशेष दिसत असतील, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा प्रश्न आहे. कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी व्हावी, रात्री सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहन क्रमांक नोंदणीची व्यवस्था करावी, कचरा जाळण्यास प्रतिबंध करावा, ओला-सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करावी, अशी मागणी होत आहे.
.............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.