विधुशेखर भारती स्वामीजींना
गोदा महाआरतीचे निमंत्रण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१२ : ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून गोदावरी महाआरतीचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात सुमारे साडेसहा हजार आदिवासी बांधव सहभागी होणार असून, सामाजिक समरसता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा समितीचा संकल्प आहे.
महाआरतीसाठी शृंगेरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आग्रहाचे निमंत्रण दिले. उपक्रमाची संकल्पना, सामाजिक उद्देश आणि विविध समाजघटकांना एकत्र आणण्यामागील भूमिका यांची माहिती त्यांना देण्यात आली. समितीने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाचे शंकराचार्यांनी स्वागत केले आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही उपस्थिती नियोजित आहे. ध्वजारोहणाचा धार्मिक सोहळा पार पडल्यानंतर सायंकाळी गोदातीरी महाआरती होणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी समाजातील सुमारे ६,५०० बंधू-भगिनींचा सहभाग. विविध समाजघटकांना एका व्यासपीठावर आणून परस्परांतील सलोखा दृढ करणे, सांस्कृतिक परंपरांचा सन्मान करणे आणि सामाजिक एकात्मतेची भावना बळकट करणे, हा यामागील प्रमुख हेतू आहे. सिंहस्थाच्या प्रारंभ सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या गोदातीरी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महाआरतीसाठी मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या पार्श्वभूमीवर आसनव्यवस्था, प्रवेश व निर्गमन मार्ग, गर्दीचे नियोजन, सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. या व्यवस्थांबाबत अंतिम आराखडा निश्चित करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.